नंदुरबार शहरात अनावश्यक बाहेर पडल्यास कारवाई: जिल्हाधिकारी

0

नंदुरबार: शहरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच रहावे. अनावश्यक बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिला आहे. येत्या 20 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषधाची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. रुग्णाच्या कुटुंबातील 6 सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाने ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते तेथील एक डॉक्टर आणि इतर पाच कर्मचारीच व अन्य तीन जवळचे नातेवाईक अशा एकूण 15 व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले आहे.

Copy