Private Advt

नंदुरबार जि.प.लघू सिंचन विभागाचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

अडीच हजारांची लाच भोवली : सुरक्षा अनामत देण्यासाठी स्वीकारली लाच

नंदुरबार/भुसावळ : लघू बंधार्‍याचे काम केल्यानंतर दहा टक्केंप्रमाणे कपात केलेल्या सुरक्षा अनामतीची रक्कम काढून देण्यासाठी अडीच हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या नंदुरबार जिल्हा परीषदेतील लघू सिंचन विभागातील कनिष्ठ सहाय्यक गुप्तेश चंद्रकांत सुगंधी (46, रा.नंदुरबार) यास नंदुरबार एसीबीच्या पथकाने कार्यालयातच लाच स्वीकारतांना अटक केली. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात मोठी खळबळ उडाली. मंगळवार, 23 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता लघू सिंचन विभागातच हा सापळा यशस्वी करण्यात आला.

अडीच हजारांची लाच भोवली
24 वर्षीय तक्रारदार यांच्या भावाने 2018-19 मध्ये नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकाणी लघू बंधारे बांधकामाचे काम मिळवले होते. बंधार्‍याचे बांधकाम 2019 मध्ये पूर्ण करण्यात आले मात्र या कामांच्या बिलामधून 10 टक्के कपात केलेली सुरक्षा अनामत रक्कम जिल्हा परीषद विभागामार्फत काढून देण्यासाठी संशयीत आरोपी गुप्तेश सुगंधी यांनी 22 रोजी अडीच हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. मंगळवारी दुपारी दोन वाजता लघू सिंचन विभागात सुगंधी यांनी अडीच हजारांची लाच स्वीकारताच त्यांना पंचांसमक्ष अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीच्या नंदुरबार शहरातील घराची झडतीही घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नाही.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, प्रभारी उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार एसीबीचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी समाधान वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विजय ठाकरे, नाईक दीपक चित्ते, नाईक मनोज अहिरे, नाईक संदीप नावाडेकर, नाईक देवराम गावीत, महिला नाईक ज्योती पाटील, चालक नाईक महाले व हवालदार संजय गुमाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.