नंदुरबार जि.प.च्या 20 कर्मचार्‍यांचे रक्तदान

0

नंदुरबार: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात नव्हे तर जगभरात मदतीचे असंख्य हात पुढे येत आहेत. त्यात खारीचा वाटा म्हणत नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत जि.प.चे अधिकारी व कर्मचारी अशा 20 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला हातभार लावला आहे.

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्या अनुषंगाने जगभरातील समाजसेवी वृत्तीची प्रचिती वेगवेगळ्या उपक्रमांतून समोर येत आहे. अशातच नंदुरबार जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी जि.प.च्या कर्मचार्‍यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला साथ देत जि.प.च्या 20 अधिकारी व कर्मचार्‍यांनी रक्तदान करून देशसेवेच्या कार्याला हातभार लावला आहे. जि.प. इमारतीमध्येच आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरावेळी सुरक्षित अंतराची काळजी घेत वेगवेगळ्या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी क्रमाने रक्तदान करून सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र), भुपेंद्र बेडसे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

नंदुरबार जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढले आहे. केंद्र शासनाच्या वर्गवारीनुसार हा जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत आहे. अशातच लॉकडाऊनमुळे जनजीवन पूर्णतः बंदिस्त झाले आहे. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत आहे. त्यात जि.प.च्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी केलेले रक्तदान नक्कीच उपयुक्त ठरेल. कार्यालयात 10 टक्के कर्मचारी उपस्थितीचे शासनाचे आदेश असल्यामुळे आधीच मोजके कर्मचारी जि.प.च्या इमारतीत उपस्थित असतांना त्यापैकी बहुतांश कर्मचार्‍यांनी या शिबिरात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. दुसरीकडे इतर अनेक कर्मचारी रक्तदानासाठी इच्छुक असूनही घरीच असल्यामुळे त्यांना या उपक्रमात सहभागी होता आले नाही. अशांसाठी पुन्हा हा कार्यक्रम आयोजित करण्याचा सूचना संबंधितांना दिल्या असल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दिली.

Copy