Private Advt

नंदुरबार जिल्ह्यात शहीद 631 शेतकर्‍यांना आदरांजली वाहण्यासाठी ‘कलश यात्रा’ दाखल

 

शहादा। उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणार्‍या चार शेतकर्‍यांना आणि एका पत्रकाराला भाजपचे नेते, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारापेक्षा अधिक शेतकर्‍यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले. या घटनेचा धिक्कार करण्यासाठी व संयुक्त किसान मोर्चाच्या आंदोलनात आजवर शहीद झालेल्या 631 शेतकर्‍यांना महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने आदरांजली वाहण्यासाठी ‘कलश यात्रा’ नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाली असल्याचे नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी सांगितले. रविवारी दुपारी 1 वाजता शहादा शहरात विविध संघटनांकडून किसान शहीद अस्थी कलश यात्रा काढण्यात आली. श्री सप्तश्रृंगी माता मंदिरापासून शहरभरातून यात्रा काढून शेतकरी आंदोलन अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने प्रांत कार्यलयात सभा घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी वाहरू सोनवणे, सुदर्शन साहुजी, चंद्रसिंग बर्ड, चुनिलाल मीना, दुर्गश खोसे, प्रदीप पाटील, ईश्वर पाटील, दादाभाई पिंपळे, जयसिंग माळी, अनिल कुवर, विष्णु जोंधळे, चेतन सावळे, लतिका राजपूत, रमाई महिला मंचचे अल्का जोधळे, पंचायत समिती सदस्य निमा पटले, इन्किलाब ब्रिगेडचे ग्रुपचे संदीप राजपाल, भारती पवार, रेश्मा पवार, तात्याजी पवार, सुनील पाटोळे, सुनील गायकवाड, पुण्या वसावे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

शहादा येथे यात्रेचे आगमन
लखीमपूर खेरी येथील शहिदांच्या अस्थी असलेले कलश महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. रविवारी, 14 रोजी शहादा येथे यात्रेचे आगमन झाले आहे. दिल्लीत शेतकर्‍यांच्या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या 11 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून शेतकर्‍यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. मात्र, कृषी कायदे अंमलात आणण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाने उघडपणे हिंसेचा मार्ग स्वीकारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापही या घटनेचा साधा निषेधही केलेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळातून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी केलेली नसल्याचेही नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी सांगितले.

मुंबईत सभा घेऊन 18 ला समारोप
अखिल भारतीय किसान सभा व नर्मदा बचाओ आंदोलन व समविचारी विविध संघटनांच्या माध्यमातून विविध मार्गांवरून राज्यभर मिरवणुका व सभा आयोजित करत राज्यातील जनचळवळींच्या विविध शक्तिस्थानांना भेटी देत यात्रा 18 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या हुतात्मा चौकात पोहोचतील. मुंबईत भव्य सभा घेऊन अस्थी महाराष्ट्राच्या मातीत विलीन करत समारोप करण्यात येणार आहे. राज्यातील संयुक्त किसान मोर्चा, संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समिती यात्रेचे संयोजन करणार असल्याचे सांगण्यात आले. सुत्रसंचलन तथा आभार विष्णू जोंधळे यांनी मानले.