चक्रीवादळ: नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

3

नंदुरबार। ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर लवकरच धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यातदेखील येत्या 24 तासात पाऊस व जोराचे वादळवारे होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी आणि घरातच रहावे, बाहेर पडू नये असे आवाहन पालकमंत्री के.सी.पाडवी यांनी केले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार काही वेळातच ‘निसर्ग’ चक्रीवादळ हे अलीबागच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. हे चक्रीवादळ मुंबईच्या समृद्र किनाऱ्यावर आल्यानंतर कदाचित त्याची दिशा बदलु शकते. या वादळाचा प्रवास नंदुरबार जिल्ह्यातून मध्य प्रदेशाकडे होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.

विशेषत: जुने घर, पत्र्याचे घर, कच्चे घर किंवा घर पडण्याचा धोका असलेल्या घरामधील राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता म्हणून आपल्या जवळच्या सामाजिक सभागृहात,शाळेत किंवा समाज मंदीरात तात्पुरता आसरा घ्यावा. शेतकऱ्यांनी आपले जनावरे झाडाखाली बांधु नये ते सुरक्षित ठिकाणी बांधावी. नदी, नाले यापासून दूर रहावे.

जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक यासाठी सज्ज आहे. जर एखादी दुर्घटना घडली तर त्वरीत ग्रामसेवक, तलाठी, गट विकास अधिकारी किंवा तहसिलदारांशी संपर्क साधाव जेणेकरुन त्वरीत मदत पोहचविणे शक्य होईल.नागरिकांनी काळजी करु नये आणि नागरिकांनी कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचना पाळावयात आणि सावध या संकटावर आपण नक्कीच यशस्वीपणे मात करु, असा विश्वास ॲड.पाडवी यांनी व्यक्त केला आहे.

Copy