नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची ‘ऐशी की तैसी’

0

नंदुरबार: गुजरातमधून वाळू भरून येणाऱ्या वाहनांनी नंदुरबार जिल्हा हद्दीतून वाहतूकीला मनाई केली आहे, अशी वाहतूक आढळून आल्यास कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ, राजेंद्र भारुड यांनी काढला आहे. मात्र प्रशासनाच्या या आदेशाची खिल्ली उडवीत वाळू वाहतूक करणाऱ्यांनी कहरच केला आहे. नजीकच्या गुजरात मधून वाळू भरून दररोज असंख्य वाहने नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांचा वापर करून जातांना दिसत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या त्या आदेशाची ऐशी की तैशी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे, नवापूर पोलिसांनी तब्बल पंचवीस वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली होती. ही घटना ताजी असतांनाच सारंगखेडा येथे तीन ते चार वाहने पकडण्यात आली, त्यांनतर कालच नंदुरबार तालुक्यातील आराळे गावात वाळू वाहतूक करणारा ट्रक पोलीस पाटील व ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाले केला, अशी अनेक उदाहरणे आहेत की नंदुरबार मधून वाळूने भरलेले ट्रक बिनधास्तपणे येतांना दृष्टीत पडत आहेत. गुजरातच्या निझर येथून ही वाळू मुंबई , नाशिक , औरंगाबाद , धुळे , पूणे अशी जात आहे . दरम्यान तळोदा नंदुरबार रस्त्यावरील हातोडा पुलावर या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकांमुळे वाहतूक कोंडी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात एका रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देण्यात आला नाही . हे एक कारण आणि कोरोनाचे कारण , या दोन कारणावरून नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी वाळूचे ट्रक नंदुरबार जिल्ह्याच्या रस्त्यावरून वापरण्यास सरसकट मनाई करणारा आदेश काढला . परंतु या आदेशाची सरळ सरळ पायमल्ली होत असल्याचे चित्र दिसत आहे. महसूल प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही,त्यामुळे वाळू वाहतूकदारांचे चांगलेच फावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Copy