नंदुरबारहुन अडीच हजार नागरिक उत्तर भारताकडे रवाना

0

नंदुरबार:सलग दुसर्‍या दिवशी प्रशासनातर्फे बिहारला जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी अररिया येथे 1 हजार 210 आणि पुर्णिया येथे 1 हजार 290 नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पंडा, तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते.
रेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था केली होती. दोन व्यक्तीत विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहर्‍यावर मास्क लावणे बंधनकारक केले होते. पोलीस उपअधीक्षक रमेश पवार, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदावळकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.जाफर तडवी आणि उप शिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी रेल्वे स्थानक परिसरातले नियोजन उत्तमरितीने केले.
दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत 4 हजार 514 नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते. जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

यंत्रणांनी चांगला समन्वय साधला
सर्व मुलांची आणि मजूरांची तपासणी केली आहे. प्रवाशांची माहिती आणि आवश्यक प्रमाणपत्रे बिहार प्रशासनाला पाठविण्यात आली आहेत. सर्व प्रवासी सुखरूप गावाकडे जात आहेत. यासाठी विविध यंत्रणांनी यासाठी चांगला समन्वय साधल्याचे सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सांगितले. बिहारचे स्थलांतरीत गावाकडे गेल्यानंतर टप्प्याटप्प्याने इतरही नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येईल. हे मोठे काम आहे. यात समन्वयाचे काम महत्वाचे असल्याचे सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा यांनी सांगितले.

Copy