नंदुरबारला रासेयोच्या विद्यार्थ्यांचा मदत कार्यात पुढाकार

0

नंदुरबार। कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था प्रशासनाला सहकार्य करीत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मदत कार्यात पुढाकार घेतला आहे. विविध भूमिकांमध्ये हे विद्यार्थी प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. विशेषत: कपड्याचे घरगुती मास्क तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

राष्ट्रीय सेवा योजनचे जिल्हा समन्वयक डॉ. माधव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने जनजागृती कार्यात उतरले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. अनेक विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याबरोबर ग्रामीण भागातील नागरिकांना या अ‍ॅपचे महत्व सांगितले. आशा स्वयंसेविकेच्या सोबत घरोघरी जाऊन कोरोनाची माहिती असो वा सर्वेक्षण, विद्यार्थ्यांनी चांगले सहकार्य केले आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क महत्वाचा असल्याने काही स्वयंसेवकांनी आपल्या अंगी असलेल्या शिवणकलेचा उपयोग करत मास्क शिवले व त्याचे वाटप केले. विशेष म्हणजे यात विद्यार्थिनींसोबत विद्यार्थ्यांचाही सहभाग आहे. आपापल्यापरिने स्थानिक स्तरावर कपडा उपलब्ध करून घेत हे विद्यार्थी मास्क शिवत आहेत. या उपक्रमात सहभाग घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

आरएफएनएस महाविद्यालय अक्कलकुवा, एसटी को ऑप एज्युकेशन सोसायटी शहादा, जीटीपी कॉलेज नंदुरबार, वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा, कला महाविद्यालय बामखेडा अशा जिल्ह्यातील विविध भागात असलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे हा उपक्रम राबविला आहे.

Copy