नंदुरबारमध्ये राजकीय पक्षांचे नगरपालिका निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन

0

नंदुरबार। शिवजयंतीचे औचित्य साधत आगामी नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर गटनेत्यांसह इच्छुकांनी मिरवणूकीत सक्रीय सहभाग घेवून शक्तीप्रदर्शन केले. आधिवेशनानंतर एका आमदारासह मोठा गट भाजपात प्रवेश करणार असल्याच्या राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. 2017 हे वर्ष नंदुरबारच्या दृष्टींने निवडणूकीचे वर्ष राहणार आहे. यामुळे शहरातील राजकारणात आतापासूनच उलथा-पालथी होवू लागल्या आहेत. आगामी नगरपालिका निवडणूकीसाठी सत्ताधारी काँग्रेस गटाला शह देण्यासाठी शहर विकास आघाडीचे नेते हिरालालकाका चौधरी यांचा एक गट सक्रीय होतांना दिसत आहे. यंदाच्या निवडणूकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या पदासाठी काँग्रेसविरोधी उमेदवार म्हणून हिरालाल चौधरी यांचे सुपूत्र तथा अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रविंद्र चौधरी यांचे नाव पुढे येवू लागले आहे. यासाठी बंद घरात विचार-विनिमय करून चाचपणी केली जात आहे. तथापी अधिवेशन झाल्यानंतर काँगे्रस विरोधा हा गट भाजपात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहे. तशा राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. निवडणूक म्हटली म्हणजे इच्छुकांचा जनसंपर्क वाढविण्यावर भर असतो. मग तो कोणताही असो त्यात आवर्जून भाग घेतला जातो. नंदुरबार शहरात मोठ्या उत्साहात साजरी झालेली शिवजयंती कशी बर अपवाद ठरणार ? शिवजयंतीचे औचित्य साधून अनेक नेत्यासह इच्छुक उमेदवारांनी या सामुहीक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेवून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन दाखवले.

राजकीय हालचालींना वेग ; भाजप नेते मात्र शांत
शिवजयंती पूर्वसंध्येला शिवसेनेचे जिल्हाप्रुमख विक्रांत मारे, भाजपाओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांनी मोटारसायकाल रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. दुसर्‍या दिवशी शिवजयंतीच्या मिरवणूकीत सक्रीय सहभाग घेवून जयंती यशस्वी केली. जयंतीनिमित्त या गटाचे ज्येष्ठ नेते हिरालाल चौधरी यांच्याहस्ते शिवाजी चौकात अन्नदान वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. काँग्रेस पदाधिकार्‍यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंतीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदविला. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे बंधू तथा उद्योगपती मनोजभैय्या रघुवंशी, राजेशभैय्या रघुवंशी यांच्याहस्ते अन्नदान कार्यक्रम झाला. नगरसेवक दिपक दिघे यांनीही वीर भगतसिंग मंडळाच्या माध्यमातून शिवजयंती मिरवणूक काढून जबरदस्त शक्तीप्रदर्शन केले. एकंदरीतच शिवजयंतीवर देखील आगामी नगरपालिका निवडणूकीची झाल नंदुरबारकरांना पाहायला मिळाली. एकीकडे राजकीय दृष्ट्या यासारख्या हालचाली सुरू असतांना भाजपाचे नेते मात्र शांत आहेत. आगामी नगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने काय भूमिका असेल हे अद्यापही भाजपाने सष्ट केले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात कोणता राजकीय भुकंप होतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.