नंदुरबारच्या महाशिबिरात रुग्णांना सर्वोपचारांची सुविधा : ना. महाजन

0

नंदुरबार। नंदुरबार येथे रविवारी होणारे महाआरोग्य शिबिर जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे. या शिबिरात नोंदणी करणार्‍या प्रत्येक रुग्णावर केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सर्वोपचार करण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले. नंदुरबार शहरातील मोदी मैदानावर महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्याची पाहणी ना. महाजन यांनी करुन आढावा घेतला.

यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र डहाळे, रुग्णमित्र रामेश्वर नाईक, विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, विजय चौधरी उपस्थित होते. शिबीरासाठी 22 समित्यांच्या माध्यमातून 1800 कार्यकर्ते शिबिराच्या नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. अडीच हजार वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत. औषधे, गोळ्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.