धोनीचे शानदार शतकाने झारखंडचा शानदार विजय

0

नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनीने साकारलेल्या शतकाच्या बळावर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडने छत्तीसगडवर ७८ धावांनी शानदार विजय मिळवला. छत्तीसगडचा कर्णधार मोहम्मद कैफने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर झारखंडची १४.४ षटकांत ५ बाद ४३ अशी केविलवाणी अवस्था झाली. परंतु धोनीने १०७ चेंडूंत १० चौकार आणि ६ षटकारांसह १२९ धावांची नेत्रदीपक खेळी साकारून संघाचा डाव सावरला. शाहबाझ नदीमने ४ चौकार आणि एका षटकारासह ५३ धावा काढत त्याला छान साथ दिली. धोनी आणि नदीमने सातव्या विकेटसाठी १६६ चेंडूंत १५१ धवांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्यामुळे झारखंडला ९ बाद २४३ धावसंख्या उभारता आली. मग वरुण आरोन आणि नदीमच्या गोलंदाजीमुळे छत्तीसगडचा डाव १६५ धावांत गडगडला.

महाराष्ट्राचा केरळवर दणदणीत विजय
महाराष्ट्राने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद करताना केरळवर १२२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ७९ धावांची खेळी करणारा ऋतुराज गायकवाड आणि ३३ धावांत ४ बळी घेणारा प्रदीप दाढे महाराष्ट्राच्या विजयाचे शिल्पकार ठरले. महाराष्ट्राने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सर्व बाद ३११ धावा केल्या. यात गायकवाड, केदार जाधव आणि नौशाद शेख यांच्या अर्धशतकांचा समावेश आहे. जाधवने ५ चौकार आणि ५ षटकारांसह ४८ चेंडूंत ७१ धावा केल्या. जलाज सक्सेनाने ५१ धावांत ४ बळी घेतले. त्यानंतर महाराष्ट्राच्या गोलंदाजांनी केरळचा डाव फक्त १८९ धावांत संपुष्टात आणला. इक्बाल अब्दुल्ला (६०) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५०) वगळता केरळचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही.