धूलिवंदनासाठी चिमुकल्यांची पिचकार्‍यांसाठी बाजारात धाव

0

भुसावळ। धूलीवंदन सण साजरे करण्यासाठी भुसावळवासीय उत्सुक असून यानिमित्त शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच यानिमित्त बाजारपेठ सजली असून होळीसाठी लागणारे हार कंगण बाजारात उपलब्ध झाले आहेत. धूलिवंदनाचा आनंद सर्वांना घेता यावा म्हणून बाजारात चायना पिचकारीची धूम सुरू आहे. याचबरोबर मगर, फिश, जंबो पिचकारी या वस्तूंनाही मागणी आहे. तसेच तरुणाईच्या मागणीनुसार रसायनविरहित इको फ्रेंडली रंगांना प्राधान्य देत बाजारात विक्रीस आणले आहेत.

बाजारपेठ सज्ज
बाजारात विविध रंग, त्यातही केमिकल युक्त व इकोफ्रेंडली असे प्रकार आहेत. केमिकल युक्त रंगामध्ये हिरवा, गुलाबी, लाल, सोनरी, चंदेरी आदी रंगांचा समावेश आहे. यांचे दर यंदा 5 टक्यांनी वाढले आहेत. इकोफ्रेंडली रंगाचे दर मात्र स्थिर आहेत. तरीही केमिकल युक्त रंगांना अधिक मागणी आहे. कलर स्प्रे, हर्बल गुलाल, हर्बल लिक्वीड, मॅजिक कलर अशा विविध प्रकारांतील रंगही विक्रीसाठी दाखल झाले आहेत.

ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह
धूलिवंदनासाठी विविध प्रकारचे रंग, पिचकारी, नवनवीन प्रकारचे फुगे आदी वस्तूंना मागणी असते. तसेच बाजारपेठेत विविध आकाराच्या चायनामेड पिचकारी विक्री साठी उपलब्ध आहेत. साधारण 20 ते 50 रूपयांपर्यंत मिळतात. त्यांच्या किंमतीतही 5 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे वाढ झाली असली तरी खरेदीचा उत्साह ग्राहकांमध्ये दिसून येत आहे.