धुळ्यासह जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी डिजिधन मेळाव्याचे आयोजन

0

धुळे । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथील जिल्हा नियोजन सभागृहात शुक्रवार 14 एप्रिल 2017 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय डिजिधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे परिपूर्ण नियोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज दुपारी बँकेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर, भारतीय स्टेट बँकेचे जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर बूध उपस्थित होते.

कॅशलेस व्यवहारासाठी प्राधान्य द्या – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढावे म्हणून डिजिधन मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या मेळाव्यास जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. या मेळाव्यास व्यापारी, युवा संघटना, एससी, एसटी असोसिएशन, स्वस्त धान्य दुकानदारांसह नागरिकांना कॅशलेस व्यवहाराबाबत मार्गदर्शन करुन कॅशलेस व्यवहाराचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. तसेच आधार कार्ड लिकिंगचा आढावा घेण्यात येईल. तालुका, ग्रामपंचायत पातळीवर आणि बँकांच्या शाखा- शाखांमध्ये डिजिधन मेळाव्यांचे आयोजन करुन अहवाल सादर करावा. 14 एप्रिलपासून सुरू होणार्‍या डिजिधन मेळाव्यात 14 ऑगस्ट 2017 पर्यंत विविध कार्यक्रम होतील, असेही त्यांनी नमूद केले.

बँकानाही दिल्या सुचना
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी पहिल्याच दिवशी शेतकर्‍याला सोपवावी. तसेच शेतकर्‍यांच्या माहितीस्तव आवश्यक कागदपत्रांची यादी बँकेच्या दर्शनी भागावर लावावी. अधिकाधिक शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याचे नियोजन बँकांनी करावे. वनहक्क कायद्यान्वये वनपट्टे मिळालेल्या शेतकर्‍यांनाही प्राधान्याने कर्जपुरवठा करावा. यासंदर्भात शासन निर्णय ही झाला आहे. त्यामुळे वनपट्टेधारक आदिवासी बांधवांनाही वेळेत कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याचा निधी तत्काळ संबंधित शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.