धुळ्यात 43 वर्षीय इसमाचा खून : कारण गुलदस्त्यात

धुळे : शहरातील 43 वर्षीय इसमाची कुठल्यातरी धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री शहरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशाल माणिक गरुड (43, अमन नगर, आंबेडकर चौक, धुळे) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी रात्री उशिरा काँग्रेस भवनासमोर मयताचा मृतदेह आढळून आला असून ही हत्या नेमकी कुणी वा कोणत्या उद्देशाने केली ? याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशीकामी दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

आरोपींच्या अटकेसाठी जमाव संतप्त
विशाल गरूड यांचा खून करणार्‍यांना तत्काळ अटक करावी यासह शुक्रवारी दुपारी शहर पोलिस ठाणे गाठून संताप व्यक्त केला. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पोलिस प्रशासनाकडून गुन्ह्याची निश्‍चित उकल केली जाईल, असे आश्‍वासन देवून जमावाला माघारी पाठवण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध
सूत्रांच्या माहितीनुसार, विशाल जगरूड हे श्री संत जगनाडे चौकाकडून तहसील कार्यालयाकडे जात असताना टॉवर बगीचासमोर दुचाकीवरून पडले व मात्र त्यांना चालता येत नसल्याने त्यांनी काँग्रेस भवनाजवळ गाडी लावली. दरम्यान, घटनास्थळी ठसे तज्ज्ञांसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून लगतच्या परीसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयीतांचा माग काढला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी योगेश पंडित पगारे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.