Private Advt

धुळ्यात डॉक्टरांकडे चोरी : दोघे आरोपी जाळ्यात

चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त : मोलकरणीसह दोघांनी केली चोरी

धुळे : शहरातील देवपुरातील विद्यानगरी परीसरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जोशी यांच्या घरातून चोरट्यांनी 3 लाख 35 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना गुरुवार, 12 ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली होती. या चोरीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून घरकाम करणार्‍या मोलकरणीसह तिचा नात्याने असलेल्या भाच्यास अटक करण्यात आली. आरोपींकडून चार लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आकाश दिलीप गुजर व ममताबाई भगवान गुजर अशी अटकेतील संशयीत आरोपींची नावे आहेत.

धाडसी चोरीने उडाली होती खळबळ
विद्यानगरातील प्लॉट नं. 222 मध्ये डॉ. संजय जोशी व कुटुंबीय राहतात. 12 रोजी सायंकाळी घराला कुलूप लावून ते बाहेर गेल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडत 75 हजार रुपये किंमतीच्या पाच तोळे वजनाच्या दोन बांगड्या, सुमारे एक लाख रुपयांचा दीड तोळ्याची सोन्याची चेन व हिर्‍यांचे पदक, एक लाख रुपयांचे कानातील दागिने, 20 हजार रुपयांचे कर्णफुले, सुमारे 40 हजार रोख असा एकूण तीन लाख 35 हजारांचा ऐवज लांबविला होता. या प्रकरणी डॉ. संजय जोशी यांच्या तक्रारीवरुन देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, कपाटाजवळच असलेल्या हँगरला कपाटाची चावी लावली असल्याची संधी चोरट्यांना मिळाली होती.

मोलकरणीवरील संशय ठरला खरा
डॉक्टरांकडील चोरी मोलकरीण ममताबाई गुजर यांनी केल्याचा सुरूवातीपासून पोलिसांना संशय असल्याने त्यांनी बारीक हालचाली टिपत पाळत ठेवली. संशयीत महिला सातत्याने बहिणीचा मुलगा आकाश दिलीप गुजर याच्या भेटीगाठी घेत असल्याने पोलिसांनी आकाशला ताब्यात घेताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चार लाख सहा हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या हिरेजडीत दागिन्यांसह रोख रक्कम व मिक्सर जप्त करण्यात आले.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस ठाण्याचे सहा.निरीक्षक चंद्रकांत पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र माळी, राजेश इंदवे, चिंचोलीकर, हवालदार योगेश कचवे, नाईक शशीकांत देवरे, मुकेश वाघ, विनोद आखडमल, किरणकुमार साळवे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.