धुळ्यात जागेच्या उपलब्धतेनंतर मुस्लिम मुलींना वसतिगृह!

0

मुंबई : धुळे जिल्ह्यातील अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजातील मुलींसाठी विद्यार्जन करता यावे यासाठी धुळ्यात वसतिगृह व्हावे यासाठी विधानसभेत आ. कुणाल पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर जागेच्या उपलब्धतेनंतर वसतिगृहास मान्यता घेण्यात येणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.

धुळ्यात मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह व्हावे यासाठी स्थानिक नागरिकांनी व माजी नगराध्यक्षांनी वेळोवेळी निवेदने दिली आहेत. निवेदने देऊन देखील मुस्लिम मुलींसाठी वसतिगृह सुरु करण्याबाबत कार्यवाही का केली जात नाही असा सवाल आ. पाटील यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले आहे की, या वसतिगृहाच्या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी व महानगरपालिका यांच्याकडे अनेकदा विनंती केलेली आहे. मात्र जागा नसल्यामुळे निर्णय घेतला जाऊ शकत नाही. जागेच्या उपलब्धतेनंतर वसतिगृहास मान्यता देण्याविषयी निर्णय घेतला जाईल असे तावडे यांनी सांगितले आहे.