धुळ्यात गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुस बाळगणारा तरुण जाळ्यात

भुसावळ/धुळे : धुळे शहर पोलिसांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतूस बाळगणार्‍या तरुणाच्या रविवार, 9 रोजी मुसक्या आवळल्या आहेत. आदित खिमशंकर भट्ट (22, रा.मनमाड जिन, पाण्याच्या टाकी समोर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने संशयीत फिरत असल्याची माहिती धुळे शहरचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. शहरातील ज्योती टॉकीजच्या बाजुला असलेल्या विजय व्यायाम शाळेच्या समोर रोडवर आदित खिमशंकर भट्ट (22, रा. मनमाड जिन, पाण्याच्या टाकी समोर, धुळे) हा आल्यानंतर पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. संशयीताच्या अंग झडतीतून 26 हजार रुपये किंमतीचा गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपी धुळे शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार व्ही.आर.भामरे करीत आहेत.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, हवालदार विलास भामरे, मुक्तार मन्सुरी, निलेश पोतदार, अविनाश कराड, तुषार मोरे, शाकीर शेख, प्रसाद वाघ आदींच्या पथकाने केली.