धुळ्यातील लाचखोर दाम्पत्याची पोलीस कोठडीत रवानगी

धुळे/भुसावळ : शिरडाणे, ता.धुळे येथील ग्रामविकास अधिकारी जयश्री हरिश्‍चंद्र पाटील (39) व त्यांचे पती तथा धुळे जि.प.च्या शिक्षण विभागातील वरीष्ठ सहाय्यक संदीप नथू पाटील (44, रा.प्लॉट नंबर 14, राका पार्क हायस्कूल जवळ, वलवाडी, धुळे) यांना 35 हजारांची लाच घेताना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी राहत्या घरी अटक केली होती. आरोपींना गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

दाम्पत्य अडकले जाळ्यात
37 वर्षीय पुरूष तक्रारदार यांचे मौजे शिरडाणे, ता.धुळे येथे सिटी सर्वे नंबर 842 एकूण क्षेत्र 250 मीटर हा प्लॉट खरेदी केला आहे. खरेदी केलेल्या प्लॉटची ग्रामपंचायत कार्यालयात नोंद होऊन प्लॉटचा 8 अ चा उतारा मिळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे वरील आरोपींनी 16 रोजी लाचेची मागणी केल्याने सापळा रचण्यात आला होता. आरोपी जयश्री पाटील यांनी लाचेचे पैसे पतीला मोजण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी पैसे मोजत लाचेची रक्कम बरोबर असल्याचे संभाषण पत्नीसोबत केल्यानंतर पतीलाही अटक करण्यात आली होती. दोघा आरोपींना गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजीतसिंग चव्हाण व सहकारी करीत आहेत.