धुळ्याच्या लाचखोर भूमी अभिलेखाची पोलिस कोठडीत रवानगी

धुळे एसीबीने एक हजारांची लाच पकडताना केली कारवाई : न्यायालयाने सुनावली कोठडी

धुळे : शेतीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी एक हजारांची लाच मागणार्‍या धुळे भूमी अभिलेख कार्यालयातील लाचखोर उपअधीक्षकाला धुळे एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. सुनील वसंत धामणे (53, रा.प्लॉट नं.1, एकविरा पार्क, आकाशवाणी केंद्रा मागे, देवपूर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 5 रोजी लाचेची मागणी करण्यात आल्यानंतर 6 रोजी सापळा यशस्वी करण्यात आला. आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर केल्यानंतर धुळे न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

लाच स्वीकारताच केली अटक
50 वर्षीय तक्रारदार यांचे मौजे चिंचवार येथे स्वतःच्या मालकीची शेती आहे. शेतीची हद्द कायम मोजणी करण्यासाठी तक्रारदाराने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे अर्ज केला होता. या जमिनीची मोजणी कामी शासकीय फी चे चलन काढून देण्याचे मोबदल्यात आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5 रोजी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आलीव 6 रोजी आरोपीला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुरोड यांच्या नेतृत्वावत पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक
मंजीतसिंग चव्हाण, जयंत साळवे, शरद काटके, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, राजन कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, संदीप कदम, भूषण शेटे, महेश मोरे, गायत्री पाटील, सुधीर मोरे आदींनी यशस्वी केला.

Copy