धुळ्याचे शासकीय तंत्रनिकेतन बंद होणार नाही

0

धुळे । जिल्ह्यातील देवपूर येथील शासकीय तंत्रनिकेतन संस्था ही जर जिल्ह्यातीलन एकमेव शासकीय तंत्रनिकेतन संस्था असेल तर ही संस्था बंद करण्यात येणार नाही. तसेच नव्याने श्रेणीवर्धीत होऊन स्थापन करण्यात येणार्‍या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे जुन्या शासकीय तंत्रनिकेतन या संस्थेला जोडूनच सुरु करण्यात येईल असे आश्‍वासन राज्याचे तंत्र व उच्च शिक्षण विभागाचे सचिव सिताराम कुंटे यांनी धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना मुंबई येथील भेटी दरम्यान दिले. प्रा.पाटील यांनी 9 फेबु्रवारी रोजी मंत्रालयात कुंटे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन 62 वर्षीय जुनी शासकीय तंत्रनिकेतन बंद न करण्याबाबत निवेदन दिले होते.

अभियांत्रिकी बंद न करण्याचा निर्णय

13 ऑक्टोंबर 2016 रोजी शासनाने सहा शासकीय तंत्रनिकेतन मधील पदविका अभ्यासक्रमाचे पदवी श्रेणीवर्धन करुन नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन करण्याबाबत निर्णय जारी केले होते. याविरोधात धुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली होती. 17 ऑक्टोंबर 2016 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर अभियांत्रिकी बंद न करण्याबाबत ठराव करण्यात आला. नियोजन मंडळाचे सदस्य धीरज पाटील यांनी याबाबतची सूचना उपस्थितीत केली होती. यानंतर सदर शासकीय निर्णय प्रलंबित असतानाच तंत्रशिक्षक संचालक एस.के.महाजन यांच्या नवीन फतव्यामुळे पुन्हा संतापाची लाट पसरली असल्याने युवासेना, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस, शिवसेना आदी पक्षांनी आपल्यापरीने आंदोलने सुरु केली होती.