धुळे शहर गोळीबाराने हादरले : तरुणाची गोळी झाडून हत्या

साक्री रोडवरील कुमार नगरात मध्यरात्रीचा थरार : दोन संशयीत जाळ्यात ; एक पसार

In Kumar Nagar in Dhule, a young man was killed by firing from a Gavathi Katta धुळे : शहरातील साक्री रोडवरील कुमार नगर भागातील तरुणाची आर्थिक व्यवहारातून झालेल्या वादातून तिघांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेनंतर घडली. या घटनेने धुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मयत व संशयीत आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या घटनेत चंदन उर्फ चिनु राजेंद्र पोपली (40, रा.कुमार नगर, साक्री रोड, धुळे) या तरुणाचा मृतयू झाला तर भटू चौधरी व यासीन पठाण (धुळे) या संशयीतांना धुळे शहर पोलिसांनी अटक केली.

मध्यरात्री झाला गोळीबार
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मयत चिनु राजेंद्र पोपली याच्याविरोधात मुंबईसह धुळे जिल्ह्यात 10 ते 12 गुन्हे दाखल असून त्याच्यावर हद्दपारीचीदेखील कारवाई करण्यात आली आहे. संशयीत आरोपी भटू चौधरी याचे अवघे साडेतीन हजार रुपये पोपलीकडे घेणे असल्याने उभयंतांमध्ये वाद सुरू असल्याने त्यांच्यात खटके उडत होते. शुक्रवारी रात्रीदेखील तीनही संशयीतांनी साक्री रोडवरील कुमार नगर गाठून पोपली यास घराजवळ गाठत त्याच्यावर गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडली व ती पोपलीच्या छातीजवळ लागल्याने त्याचा जागीच मृत्यू ओढवला. गोळीबाराने संशयीत पसार झाले तर कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

पहाटेच्या सुमारास आवळल्या मुसक्या
गोळीबाराची माहिती कळताच प्रभारी अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह धुळे शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पहाटेच्या सुमारास संशयीत भटू चौधरी व यासीन पठाण (धुळे) याच्या मुसक्या आवळण्यात धुळे शहर पोलिसांना यश आले. शनिवारी पोपली याच्या खून प्रकरणी पवन गुडियाल यांच्या फिर्यादीनुसार भटू चौधरी व यासीन पठाण (धुळे) व अन्य एक अनोळखीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील आरोपींविरोधातही पोलिसात गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.