धुळे शहरात 67 लाखांच्या गुटख्यासह दोघे जाळ्यात

चाळीसगाव रोड पोलिसांनी पाठलाग करून संशयीतांच्या आवळल्या मुसक्या

धुळे/भुसावळ : राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक चाळीसगाव रोड पोलिसांनी पाठलाग करून अडवत ट्रकसह सुमारे 67 लाखांचा गुटखा जप्त केल्याने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ शनिवार, 4 रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. ट्रक चालक शेख हारुन शेख हुसेन (48, रा.गल्ली नं.9, आझादनगर, मालेगाव जि.नाशिक) व क्लिनर मोहम्मद समील मोहम्मद सलीम (वय 19, रा.कमालपुरा, मालेगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मालेगावकडून जळगावकडे जाणार्‍या एका ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाल्यानंतर पोलिस पथकाने शनिवारी रात्री हॉटेल द्वारकालॉज समोर सापळा रचला होता. यावेळी संशयीत ट्रक (क्रमांक. एम.एच.15 जी.व्ही.9741) येतांना दिसल्याने पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा इशारा केला परंतु चालकाने पोलिस पाहुन ट्रक न थांबविता वाहन पळवले. यावेळी पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करीत मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल इस्लामी ढाब्याजवळ ट्रक अडवला. यावेळी पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात खाकी रंगाच्या कार्टून व सफेद रंगाच्या गोण्या सुगंधीत पान मसाल्याचा सुगंध येत असल्याने खातरजमा केल्यानंतर त्यात पानमसाला व तंबाखूचा साठा मिळून आला.

ट्रकसह 67 लाखांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी ट्रकमधून 36 लाख 27 हजार 800 रुपये किंमतीचा विमल गुटखा, सहा लाख 27 हजार रुपये किंमतीची तंबाखु, 25 लाख रुपये किंमतीचा 12 चाकी मालट्रक असा मुद्देमाल जप्त केला. अटकेतील दोघा चालक व वाहकांना केवळ गुटखा वाहतुकीची जवाबदारी देण्यात आली होती त्यामुळे हा माल नेमका कुणाचा व कुणाला पाठवण्यात येत होता याबाबतची चौकशी चाळीसगाव रोड पोलिसांकडून सुरू आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बणच्छाव, पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक एन.जी.चौधरी, उपनिरीक्षक नासीर पठाण, हवालदार पंकज चव्हाण, कैलास वाघ, भुरा पाटील, अविनाश पाटील, संदीप कढरे, हेमंत पवार, स्वप्नील सोनवणे, सोमनाथ चौरे, प्रशांत पाटील, शरद जाधव, चालक किरण राजपूत आदींच्या पथकाने केली.