धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी 27 पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित

0

अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार
धुळे: शहरात कोरोना विषाणूचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून एका जणाचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव व संक्रमण रोखण्यासाठी धुळे शहरात महानगरपालिकेच्या हद्दीत 23 एप्रिलच्या रात्री 00.01 वाजेपासून ते 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन (संचारबंदी) लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. ही संचारबंदी नागरिकांच्या हितासाठीच असून नागरिकांनी घाबरून न जाता संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करत जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यादव यांनी केले आहे.
धुळे शहरात सहा तर शिंदखेडा व साक्री तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना विषाणूबाधित असे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य रुग्णांवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा वेग पाहता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय या शासनाने घेतला आहे.
धुळे जिल्ह्याला लागू असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात व मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात कोरोना संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. तसेच धुळे शहरात सहा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यापैकी एक कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या प्रसार एका व्यक्तीपासून अन्य व्यक्तीस होण्याची शक्यता असल्याने जिल्हादंडाधिकारी यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड 19 विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी घोषित केलेले प्रतिबंधित क्षेत्र वगळून ही संचारबंदी लागू राहील.

Copy