धुळे तालुका पोलिसांकडून 11 लाखांचा गुटखा जप्त

तिघांना अटक : 20 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे/भुसावळ : चाळीसगाव रोड पोलिसांनी सुमारे 43 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना ताजी असतानाच धुळे तालुका पोलिसांनी सुमारे 11 लाखांचा गुटखा पकडल्याने गुटखा तस्करांच्या गोटात खळबळ उडाली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सोमवार, 6 डिसेंबर रोजी पोलिसांनी सापळा रचला. लक्झरी (जी.जे.19 एक्स.9993) मधून गुटख्याची तस्करी नेरमार्गे होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहन अडवत तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळल्याने वाहन जप्त करण्यात आले. लक्झरी वाहनात 10 लाख 80 हजार 200 रुपयांचा विमल पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. लक्झरी वाहनावरील चालक शेख लतीफ शेख अन्वर (28, रा.ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव, जि.जळगाव), मॅनेजर नदीमखान आसीफखान (27, रा.भडगाव, जि.जळगाव) व क्लिनर विकास सहादू महाजन (वय 28 रा.वरखेडी ता.चाळीसगाव) यांना ताब्यात घेण्यात आले तर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला पत्र देण्यात आल्याची माहिती पत्रकार परीषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी सोमवारी दिली. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात वाहतूक, साठा व विक्रीस प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखु असलेला एकूण 10 लाख 80 हजार 20 रुपयांचा माल व वाहन असा एकूण 20 लाख 80 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकातील सागर काळे, हवालदार प्रवीण पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, प्रमोद ईशी, सुमीत चव्हाण, ज्ञानेश्वर गिरासे आदींच्या पथकाने केली.