धुळे तालुका दुष्काळग्रस्त नाही!

0

मुंबई:- दुष्काळाची परिस्थिती असताना देखील धुळे जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले नसल्याने शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. यासाठी प्रशासनाला अनेकदा निवेदने आणि मागणी केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सुधारित आणेवारी जाहीर करून धुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासंबंधी सवाल धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी उपस्थित केला असता धुळे तालुका दुष्काळग्रस्त होण्यासंबंधी प्रश्नच उद्भवत नसल्याचे उत्तर शासनाकडून मिळाले आहे.

धुळे तालुक्यातील 170 गावांची आणेवारी जाहीर करण्यात आली असून त्यात 138 गावांची अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे तर अत्यल्प पाऊस पडून देखील 67 गावांची पैसेवारी 50 पैशापेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. ज्या गावांची आणेवारी 50 पेक्षा जास्त दाखविली आहे त्या गावांमध्ये चारा व पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याचे खरे आहे का? असा प्रश्न आ. कुणाल पाटील यांनी उपस्थिग केला होता. यावर ही माहिती खरी नसल्याचे उत्तर शासनाकडून मिळाले आहे.

त्याचबरोबर सुधारित आणेवारी जाहीर करून धुळे तालुका दुष्काळग्रस्त करण्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली आहे का? करण्यात येणार आहे का? असेही आ. पाटील यांनी विचारले असता प्रश्नच उद्भवत नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.