धुळे जिल्ह्यातील 73 ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान

0

प्रशिक्षणानंतर अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना

धुळे- जिल्ह्यातील 73 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार, 26 सप्टेंबर रोजी मतदान होत आहे. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. सायंकाळी कर्मचारी व अधिकारी मतदान केंद्रांवर रवाना झाले. 27 सप्टेंबर रोजी मतमोजणी तहसील कार्यालयात होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान यंत्रे नेण्यासाठी खाजगी वाहने अधिग्रहीत करण्यात आली असून मतदान प्रक्रियेच्या साहित्यासह कर्मचार्‍यांना नेण्यासाठी एस.टी.बसेसची व्यवस्था करण्यात आली.

83 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
धुळे जिल्ह्यात एकुण 83 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यापैकी 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे बुधवार, 26 सप्टेंबर रोजी 73 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यात धुळे तालुक्यातील 14, साक्री तालुक्यातील 32, शिरपूर तालुक्यातील 15 आणि शिंदखेडा तालुक्यातील 20 अशा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी मतदानासाठी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना चारही तहसील कार्यालयात सकाळी मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिल्यानंतर दुपारी त्यांना मतदान साहित्य देऊन खाजगी वाहनाने मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहे.