धुळे जिल्ह्यातील डॉक्टरांना मारहाण

0

धुळे । शहर व शिरपुर येथे रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करण्याची घटना मंगळवारी घडली. यात धुळे येथील डॉ भाऊसाहेब हिरे महाविद्यालय संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात रूग्णावर योग्य उपचार केले जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी करून रूग्णालयात तोडफोड केली. तर शिरपुर येथे विवाहीतेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी खाजगी रूग्णालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, धुळे येथील डॉक्टरांना मारहाण करणार्‍या 9 जणांना पोलीसांनी अटक केली होती. यातील एकाने शहर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्या केली आहे.

सोमवारी करण्यात आले होते दाखल
धुळे शहरातील चक्करबर्डी येथील डॉ भाऊसाहेब हिरे महाविद्यालय संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात योग्य उपचार होत नसल्याचा दावा करत नातेवाइकांनी डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. नातेवाईकांनी रूग्णालयात तोडफोड करीत सामानाची मोडतोड केली. सोमवार 13 मार्च रोजी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रूग्णालयात दाखल असलेल्या रूग्णाचे सिटीस्कॅन करण्यासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांकडे आग्रह केला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण कुमार नागे यांनी सिटी स्कॅनची गरज नसल्याचे सांगत उपचार सुरू ठेवण्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या उत्तराने रूग्णांचे नातेवाईकाचे समाधान न झालेल्या त्यांनी डॉक्टर रोहन मामुनकर यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. यात त्यांच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली आहे. डॉक्टरांना हाता बुक्क्यानी व लाथांने मारहाण करीत रूग्णालयाची तोडफोड करून सामानाची मोडतोड करण्यात आली आहे. याप्रकरणी डॉ.अरूणकुमार नागे यांनी शहर पोलिस गुन्हा दाखल केला आला. मारहाण करणार्‍या चंद्रकांत लष्कर, अजय लष्कर, एकनाथ लष्कर, लखत कुसळकर, एकनाथ कुसळकर, अवादास कुरळकर, सुनिल कुरळकर, छोटू विटेकर, प्रदीप वेताळे यांच्यावर भादंवि कलम 353, 143, 147, 149, 323, 504, 427 प्रमाणे आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 9 जणांना पोलिसांनी अटक
केली आहे. दरम्यान यातील संशयीत प्रदीप वेताळे याने पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्त्या केली आहे.

कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन
डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ मंगळवार 14 मार्च रोजी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर व परिचारिका यांनी कामबंद आंदोलन पुकारण्याले होते. यावेळी डॉक्टरांनी निदर्शने केलीत. मारहाण करणार्‍यांना त्वरीत अटक करून कडक शासन करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉक्टर व परिचारिकाकडून हातात निषेधाचे फलक घेवून कामबंद आंदोलन करण्यात आले.

वादग्रस्त हॉस्पिटल
शहरातील अग्रवाल हॉस्पिटल हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरत आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी गिधाडे येथील 12 वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने त्यावेळी देखील संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली होती. यांसह अनेक घटनांमुळे हे रूग्णालय वादग्रस्त ठरले आहे.

जास्त रक्तस्त्रावाने मृत्यू
शिरपूर शहरातील आदर्श नगरात असलेल्या डॉ.बी.टी.अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलला प्रसुतीसाठी दाखल करण्यात आलेली विवाहिता प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केल्याची घटना मंगळवार 14 रोजी घडली. दरम्यान याबाबत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाल्मिक नगरातील दिपालीबाई उदय ढोले (28) या विवाहितेची पहिलीच प्रसुती असल्याने तिला शहरातील डॉ.बी.टी.अग्रवाल यांच्या अग्रवाल हॉस्पिटलला सोमवार 13 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. पहाटे तिला प्रसुती वेदना होवू लागल्यानंतर रूग्णालयात संबंधीत डॉक्टर उपस्थित नसल्याने तेथे असलेल्या परिचारीकांनी त्या विवाहितेची प्रसुती केली. तीने गोंडस अशा मुलीला जन्म दिल्यानंतर तीला अती रक्तस्त्राव होवू लागल्याने तिचा मृत्यू झाला.

डॉक्टरांनी दिले उडवाउडवीचे उत्तरे
विवाहितेचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजल्यानंतर अनेकांनी रूग्णालयाकडे धाव घेतली. डॉक्टरांना याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. त्यातच वातावरण जास्त तापत असतांनाच काही संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयावर दगडफेक करून डॉक्टरांच्या दालनाची तोडफोड केली. विवाहितेचा मृत्यू झाल्याची बाब डॉक्टरांनी तब्बल दोन तासांपर्यंत आम्हाला समजू दिले नाही असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला. डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे दिपालीचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची करा अशी मागणी नातेवाईक करत होते. काही वेळातच पोलीसांचा प्रचंड ताफा त्या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश मिळाले. घटनेनंतर रूग्णालयाबाहेर पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. दुपारी 12.30 वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत वार्ड बॉय विनोद निकम यांनी दिलेल्या खबरीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बंदमुळे रूग्णांचे हाल
डॉक्टरांना मारहाणीच्या निषेधार्थ हिंरे मेडीकले रूग्णालयातील डॉक्टरांनी अचानक बंद पुकारला. यामुळे रूग्णालयात उपचार करण्यासाठी आलेल्या रूग्णांचे प्रचंड हाल झाले. होळीनिमित्त रूग्णालय बंद सारखी अवस्था होती. त्यातच अचानक बंदमुळै भरती असलेल्या रूग्णांचे हाल झाले.