Private Advt

धुळे जिल्हा रुग्णालयातुन ऑक्सिजन प्रकल्पाच्या बॅटऱ्या चोरल्या

 

धुळे – जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या दोन जनरेटरमधील बॅटऱ्या चोरट्यांनी लांबवल्या. विशेष म्हणजे दोन्ही जनरेटरचे कुलूप न तोडता ही चोरी झाली. चोरीस गेलेल्या बॅटऱ्यांची किंमत निश्चित न झाल्यामुळे उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
कोरोनाच्या अॅमिक्रॉन व्हेरियंटचे संकट व शहरात पुन्हा बाधित आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची तपासणी तज्ज्ञ कर्मचारी करत होते. पण प्रकल्प सुरू हाेत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी जनरेटर उघडून बघितले. त्या वेळी जनरेटरची बॅटरी चोरीस गेल्याचे समोर आले. त्यानंतर दुसऱ्या ऑक्सिजन प्रकल्पाच्या जनरेटरची तपासणी केली. या जनरेटरचीही बॅटरी चोरीस गेल्याचे समोर आले. दोन्ही जनरेटरचे लॉक न तोडता या बॅटरी लांबवण्यात आली. याविषयी शहर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी जनरेटरची पाहणी केली.

पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले होते. जिल्हा रुग्णालयातील एक कर्मचारी तक्रार देण्यासाठी आला होता. नियमानुसार बॅटरीची किंमत एफआयआरमध्ये घ्यावीच लागेल. पण किंमतच स्पष्ट नसल्यामुळे तक्रार दाखल केली नाही, अशी माहिती पोलिस अधिकारी नितीन देशमुख यांनी दिली.

दोन्ही जनरेटरचे कुलूप सुस्थित आहे. मग चोरी झाली कशी असा प्रश्न निर्माण होतो. जनरेटर व बॅटरीबाबत जाण असणाऱ्यानेच चोरी केल्याचा अंदाज आहे.
मोठी चोरी, छोटा मुद्दा : प्रकल्प उभारताना सरसकट जनरेटर आणण्यात आले होते. त्यामुळे त्यातील इतर घटक वगळता केवळ बॅटरीची किंमत निर्धारित होऊ शकली नाही.