धुळे गुन्हे शाखेने पकडला 34 लाखांचा गुटखा : आयशर चालकासह दोघांना अटक

Gutkha worth Rs 34 lakh seized near Palasner : Action by Dhule Crime Branch धुळे : शिरपूर तालुक्यातील पळासनेरनजीक धुळे गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे आयशर वाहनातून सुमारे 34 लाखांचा राज्यात प्रतिबंधीत गुटखा जप्त केला असून परप्रांतीय दोघांच्या मुसक्या बांधल्या आहेत. या कारवाईने गुटखा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान-मसाल्याची आयात पर राज्यातून करून त्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना कारवाईचे आदेश दिले होते. पथकाने सापळा रचल्यानंतर मंगळवार, 4 ऑक्टोंबर रोजी सकाळी सात वाजता दहिवद गावाजवळील हॉटेल किशन जवळ पळासनेरकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने आयशर (एम.एच.18 बी.जी.7620) आल्यानंतर तपासणी केली असता त्यात गुटखा आढळल्याने आयशर चालक शाकीर जाकीर खान (24) व क्लीनर शादाब हैदर खान (25, दोन्ही बामदा, कसरावत, जि.खरगोन, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली.

सुमारे 34 लाखांचा गुटखा जप्त
आयशर वाहनातून पोलिसांनी 16 लाख 32 हजार 960 रुपये किंमतीचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला, 11 लाख 34 हजार रुपये किंमतीची भोला छाप तंबाखू, 84 हजार रुपये किंमतीची भोला छाप येलो तंबाखू, दोन लाख 11 हजार 680 रुपये किंमतीची तुलसी तंबाखू, तीन लाख 36 हजार रुपये किंमतीची मिराज सुपर तंबाखू व दहा लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन मिळून एकूण 43 लाख 98 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे यांच्यामार्फत शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली गुटख्यावर कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, अशोक पाटील, संदीप सरग, प्रकाश सोनार, कुणाल पाटील, उमेश पवार, रवीकिरण राठोड, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.