Private Advt

धुळे गुन्हे शाखेची कामगिरी : 20 लाखांच्या अवैध बायोडिझेलचा टँकर जप्त

30 लाखांचा मुद्देमाल जप्त : चालकासह तिघांना पोलिसांनी केली अटक

धुळे/भुसावळ : सुरतहून बायोडिझेलची टँकरद्वारे अवैधरीत्या वाहतूक होत असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने गुरुवार, 25 रोजी सापळा रचून टँकर जप्त करीत चालकासह तिघांनी अटक केली. 20 लाख रुपये किंमतीच्या बायोडिझेलसह दहा लाखांचा टँकर पोलिसांनी जप्त केला आहे. मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

सापळा रचून कारवाई
सुरत येथून बायोडिजेल/इंडस्ट्रियल ऑईल भरून टँकर (क्र.जी.जे.05 ए.यु.9025) हा मालेगावकडे निघाल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर मुंबई-आग्रा रोडवर अवधान फाटा येथे सापळा रचण्यात आला. गुरुवारी रात्री 9.15 वाजता टँकर आल्यानंतर टँकर चालक जयप्रकाश रामशब्द विश्वकर्मा (रा.सुखीपूर, जि.आझमगड, उत्तरप्रदेश) व अल्तमश मिया इरफान मिया (रा.चिराग गल्ली, नंदुरबार) व मनोज भगवान माळी (रा.माळीवाडा, नंदुरबार) यांच्याकडे मालाच्या बिलाबाबत विचारपुस केली असता त्यांच्याकडे कोणत्याही स्वरुपाची बिले आढळून आली नाही. संशयीतानी हा माल हाजिरा पोर्ट येथून मंगेश सिंधी व त्याचा भाऊ योगेश सिंधी, विजय माळी यांच्या सांगण्यावरून भरून तो मालेगावात नेत असल्याचे कबुली दिली. पथकाने 19 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 25 हजार लीटर बायोडिझेल तसेच दहा लाख रुपये किंमतीचा टँकर जप्त केला. दरम्यान, वरील सहा आरोपींविरुद्ध मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 105/2021, भादंवि 285, 177 व जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहा.निरीक्षक प्रकाश पाटील, उपनिरीक्षक योगेश राउत, उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संदीप सरग, योगेश चव्हाण, मयुर पाटील, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, तुषार पारधी, महेंद्र सपकाळ आदींच्या पथकाने केली.