धुतले तांदूळही आता शिल्लक नाहीत!

0

राजकारणात पुन्हा धनाढ्यांचे नवे चातुर्वर्ण्य निर्माण झाले आहेत, त्यात शूद्र ठरला आहे, प्रामाणिक सामान्य माणूस, या माणसाला आता निवडणुकीची दारे कायम बंद झाली आहेत. हे मान्य करून येणार्‍या काळात पुढे जावे लागणार आहे. मात्र, या प्रवासात आपल्याला नेहमीच्या डुलक्या थांबवाव्या लागतील, एका डुलकीची शिक्षा पाच वर्षे असते डोळ्यात तेल घालून जागलो नाही तर धुतले तांदूळही शिल्लक राहणार नाहीत.

राजकारणात अनेक व्याख्या आणि संदर्भ बदलत असतात, पक्षांच्या वकुबाप्रमाणे त्यात काम करणार्‍यांचे दृष्टिकोन आणि चष्मे सुद्धा बदलतात आज प्रामाणिक असणारा उद्या चोर आणि काल खिसेकापू असणारा चारित्र्याचा पुतळाही बनू शकतो. तुम्ही कोणत्या बाजूला आहेत यावरून त्याचे विश्लेषण केले जाते. विरोधी पक्ष खरोखर सुदृढ असेल तर ती मान्य न करता त्याला सूज आल्याचे म्हणण्याची नवी प्रथा आता रूढ झाली आहे. असाच प्रयत्न गेले महिनाभर भाजप सेनेबाबत करीत असल्याचे दिसत आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक पारदर्शक शब्दाचा खेळ करायचे ठरवून आपणच राजकारणातले मिस्टर क्लीन कसे आहोत याचे प्रदर्शन केले. सेना – भाजपाची युती तुटेपर्यंत जनतेने दोन्ही कडील वक्तव्ये, शह -काटशह यांचा आनंद घेतला, खरंतर लोकांना सगळे कळते, कोण किती पाण्यात आहे नि कोणाचे कसे चालले आहे. पारदर्शीपणाचा आव आणणारे मुख्यमंत्री मुंबईची जबाबदारी घेतात आणि प्रचार यंत्रणेसाठी पाण्यासारखा पैसा उपलब्ध करून देतात याचा नेमका अर्थ कळत नाही असा व्यक्ती शोधून तरी सापडणार आहे का?

राजकारणात आताशा कुणी पडत नाही तर ठरवून उडी घेतात, आणि जे उडी घेतात त्यांच्यापुढे आगामी 25 वर्षाचा अजेंडा तयार असतो. कोणेएकेकाळी मुंबईच्या रस्त्यावर हमाली करून पोटाची खळगी भरणारे कृपाशंकर सिंग राजकारणात अचानक प्रगती करतात आणि अल्पावधीत सामान्य माणसाचे डोळे पांढरे होतील एवढी संपत्ती कमावतात हे सगळे कसे होते हे लक्षात येणार नाही एवढा भारतीय मतदार नक्कीच दुधखुळा राहिला नाही. असे भणंगाचे कुबेर झालेले अनेक कृपाशंकर सगळ्याच पक्षात आहेत आणि लोकांना त्याची माहिती आहे. राजकारणाला जुगार समजून तो खेळणारे असंख्य आहेत, लोक त्यांचा अनेकदा डाव उधळून टाकतात मात्र बहुतेकदा हे जुगारी यशस्वी होताना आपण बघत आलो आहोत. निवडणुकीला सामोरे जाताना नेते, नगरसेवक त्यांची संपत्ती जाहीर करतात पण पाच वर्ष झाल्यावर आधीची आणि आताची संपत्ती अभ्यासावी, त्याची तुलना करावी असे बहुतेकांना वाटत नाही.

अपवाद वगळता एकही नेता असा आढळणार नाही की ज्याच्या संपत्ती मध्ये गेल्या पाच वर्षात वाढ झालेली नाही, मुंबई, ठाणे आणि पुण्यात तर असे नगरसेवक आहेत की आपल्या प्रभागात उभ्या राहणार्‍या प्रत्येक स्कीम मध्ये त्यांची सदनिका किंवा भागीदारी तरी आहेच. शंभर रुपये गुंतवणूक करून लाखभर रुपये काढणारा राजकारण हा एकमेव धंदा बनला आहे. जे अशाकाळात आपण त्यापासून लांब असल्याच्या वल्गना करतात ते संधी अभावी सज्जन राहिलेले समजले जातात. मतदार म्हणून आपणही याकाळात तयारी करतो का? असा प्रश्न मला पडतो, त्याचे उत्तर नेहमीच नकारार्थी मिळते. आपण निव्वळ टाईमपास करीत जातो आणि पुढील चार वर्ष अकरा महिने महापालिकेच्या नावाने बोंबा मारीत असतो. जात, गट आणि पक्ष बघण्याच्या हव्यासापोटी नालायक आणि अतिशय सुमार व्यक्ती आपण निवडतो पुढे नागरी समस्यांची चाबी आपल्या कमरेला लटकावून हे कुरणात चरायला मोकळे होतात.

ज्याला धड मराठी चार शब्द बोलता येत नाहीत, ज्याने कधीच कुणाला साधे निवेदनही लिहिले नाही, इंग्रजीचे नाव काढल्यावर ज्याला हिवताप येतो अशी माणसे पालिका सभागृहात निव्वळ झोपा काढण्याशिवाय दुसरे काहीही करू शकत नाहीत हे आजवर आपण पाहत आलो आहोत. ज्याला स्वतःचे मत मांडता येते तोच उद्याचे नियोजन करू शकतो, लोकांचे जगणे सुसह्य करण्याचा विचार करू शकतो हे साधे गणित आहे पण या निकषात न बसणारे लोकशाहीच्या दुर्दैवाने विजयाच्या जवळ जाऊन पोहोचतात आणि सगळे निकष पूर्ण करणार्‍याची अनामत रक्कम जप्त होते अशा विचित्र खेळाचे आपण सगळे प्यादे बनलो आहोत. काही लोक असाही युक्तिवाद करतात की कशाला हवा नगरसेवक स्मार्ट किंवा हुशार? सगळे हायर करता येते की. वरकरणी या युक्तिवादात तथ्य असले तरी सगळे काही पैश्याने विकत घेता येते अगदी मतदार सुद्धा हा विश्वास बळावत जातो आणि तेच लोकशाहीला घातक ठरत आले आहे.

राजकारणातून पैसा उपसण्याचा सराव गेल्या काही वर्षात वाढला आहे, त्याला आपणही तेवढेच जबाबदार आहोत हे मान्य करायला आपण उगाच आढेवेढे घेतो, पैसे खाणारा लोकप्रतिनिधी काहीतरी चुकीचे करतोय असे आता कुणाला वाटतच नसेल तर ही साचलेली घाण कोण आणि कशी साफ करायला पुढे येईल या बद्दल चिंता वाटते. दुर्जनांच्या उपद्रवापेक्षा सज्जनाची निष्क्रियता फार भयानक असते असे म्हणतात त्याचा अनुभव आपण घेत आहोत, एकमेकांकडे भ्रष्टचाराबाबत बोट दाखविताना आता कुणीच धुतल्या तांदळाचा दिसत नाही, हे असे का व्हावे याचे उत्तर चारित्र्याच्या गप्पा मारणार्‍या फडणवीस यांच्याकडेही नाही. राजकारणात पुन्हा धनाढ्यांचे नवे चातुर्वर्ण निर्माण झाले आहे, त्यात शूद्र ठरला आहे, प्रामाणिक सामान्य माणूस, या माणसाला आता निवडणुकीची दारे कायम बंद झाली आहेत, हे मान्य करून येणार्‍या काळात पुढे जावे लागणार आहे मात्र या प्रवासात आपल्याला नेहमीच्या डुलक्या थांबवाव्या लागतील, एका डुलकीची शिक्षा पाच वर्ष असते डोळ्यात तेल घालून जागलो नाही तर धुतले तांदूळही शिल्लक राहणार नाहीत.

(लेखक दैनिक जनशक्ती मुंबईचे कार्यकारी संपादक आहेत.)
-पुरुषोत्तम आवारे पाटील
9892162248