‘धनुष्यबाणा’ला कचर्‍याची किंमत

जळगाव – एकदा वापर करून झाला म्हणजे फेकण्यासारख्या बर्‍याच गोष्टी असतात. कारण, वापरानंतर त्यांची किंमत शून्य असते. आता जळगाव महापालिकेतच पाहा – भाजपाच्या राशीला लागलेल्या नवग्रहांनी धनुष्यबाण आणि नऊ अंकाचे चिन्ह मध्यंतरी मोठ्या उत्साहात नूतन महापौरांना भेट म्हणून दिले होते पण, त्याचे औचित्य संपताच तेही कचर्‍यात पाहायला मिळाले. हीच का ‘ती’ किंमत ? बंडखोरांनी नऊ हा अंक आणि धनुष्यबाण फुलांनी सुशोभित करून मोठ्या विश्‍वासाने, आपुलकीने, प्रेमाने महापौरांकडे सुपूर्द केला होता. नंतर ही दोन्ही चिन्हे कचर्‍यात पाहायला मिळाली. भविष्यात शिवसेनेचा सुप्त (?) हेतू साध्य होताच भाजपातून फुटून निघालेल्या नगरसेवकांचीही गत वरील चिन्हांप्रमाणेच होणार का ? त्यांनीदेखील विचार करावा ! शिवसेनेने आपल्या स्वतःच्या सत्तेसाठी भाजपाचे 27 नगरसेवक फोडले. एकप्रकारे त्यांनी स्वार्थच साधला. या फोडाफोडीत जळगावकरांचे भले केव्हा होईल ? हे माहित नाही पण जे फुटून निघाले त्यांना त्यांची जागा शिवसेना नेतृत्त्वाने नक्कीच दाखवून दिली, असे यानिमित्ताने म्हणावे का ? सत्तेचा रंग एवढ्या लवकर नेतृत्त्वाला चढावा हे आश्‍चर्यच आहे. कोण, कोणाची माती करतोय याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनशक्तीने प्रतिक्रिया जाणून घेतली असता, शिवसेनेचे नगरसेवक सुनील महाजन यांनी आपल्याला माहित नसल्याचे सांगितले. सफाई कर्मचार्‍यांकडून चूक झाली असेल, असेही ते म्हणाले.