धनादेश अनादर प्रकरण : बोदवडच्या एकास सहा महिने कारावास व दोन लाखांचा दंड

बोदवड : धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी एकास सहा महिने शिक्षा व दोन लाख दंड न्यायालयाने सुनावला. बोदवड येथील विलास लक्ष्मण बारी यांच्याकडून बोदवड येथील आकाश विश्वनाथ जाधव याने लग्न व इतर कौटुंबिक गरजांपोटी सहा लाख 35 हजार रुपये उसनवार घेतले होते. रक्कम परतफेडीसाठी आकाश जाधव याने स्टेट बैंकचे तीन लाख आणि तीन लाख पस्तीस हजार असे दिनांक 31 जुलै 2017 रोजी वटणारे दोन धनादेश विलास बारी यांना दिले होते. हे धनादेश न वटल्याने बारी यांनी जाधव यास तुमच्या खात्यात पैसे कमी असल्याने धनादेश न वटता परत आल्याचे सांगितले असता जाधव याने दहा दिवसांत व्यवस्था होईल तुम्ही त्या नंतर धनादेश वटण्यास टाका, असे सांगितले त्या नुसार पुन्हा धनादेश वटण्यास टाकले असता न वटता पुन्हा परत आले त्या वेळी परत जाधव याने पंधरा दिवसांची मुदत देऊन धनादेश टाका, अशी विनंती केली त्या नुसार धनादेश वटण्यास जमा केले असता पुन्हा ते जाधव यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने परत आले. त्यानंतर विलास बारी यांनी वकील विकास शर्मा यांचेद्वारे आकाश जाधव यांना नोटीस दिली परंतु समाधान कारक उत्तर न आल्याने अखेर बोदवड न्यायालयात विलास बारी यांनी आकाश जाधव यांच्याविरुद्ध खटला दाखल केला.

आरोपीला दंड व शिक्षा
न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. विलास बारी यांची न्यायालयाने तक्रार ग्राह्य धरत आकाश जाधव यास तीन लाख पस्तीस हजाराचे धनादेश अनादर प्रकरणी तीन महिने शिक्षा व एक लाख दंड नुकसान भरपाई म्हणून एकूण चार लाख पस्तीस हजार देण्याचे आदेश केले तर दुसर्‍या तीन लाखांच्या धनादेश अनादरप्रकरणी तीन महिन्याची शिक्षा व एक लाख दंड नुकसान भरपाईपोटी विलास बारी यांना द्यावे, असे आदेश दिले. या दोन्ही धनादेश प्रकरणी मूळ रक्कम व नुकसानभरपाई म्हणून एकूण आठ लाख पस्तीस हजार अशी रक्कम आकाश जाधव यांना विलास बारी यांना द्यावी लागणार आहे. बोदवड येथील न्यायालयात न्यायाधीश एस.डी. गरड यांच्या न्यायासनासमोर चाललेल्या खटल्यात तक्रारदार विलास बारी यांच्यातर्फे अ‍ॅड.विकास शर्मा यांनी कामकाज पाहिले.