धनगर समाज आरक्षणाचा प्रश्‍न फडणवीस सरकारने केला जटील

0

डॉ.यशपाल भिंगे : महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचतर्फे गुणवंतांचा सत्कार

भुसावळ- 1989 साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी धनगरांना साडेतीन टक्के घटनाबाह्य महाराष्ट्रापुरते तटपुंजे आरक्षण देऊन देवाच्या आळंदी ऐवजी चोराच्या आळंदीच्या एस.टी.त बसवल्याचा घणाघाती आरोप इतिहासाचे प्रमुख वक्ते व राजकीय विश्‍लेषण डॉ.यशपाल भिंगे यांनी येथे केला. 2014 च्या भाजपच्या आश्वासनाला भुलून लोकसभा आणि विधानसभेला महाराष्ट्रातील धनगरांनी संकल्पपूर्वक एकगठ्ठा मतदान केल्यामुळेच सध्याचे देवेंद्र फडणवीस सरकार आले मात्र त्यांनी आरक्षणाचा प्रश्‍न अधिक जटील केल्याचे ते म्हणाले. शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात नुकताच महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 223 व्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा झाला. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य मुंबई व महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना यांच्या भुसावळ तालुका कार्यकारणीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

धनगर बांधवांनी ठेवावी त्यागाची तयारी -डॉ.भिंगे
डॉ.भिंगे म्हणाले की, फडणवीस सरकारने आरक्षणाचा प्रश्न अधिक जटील करून ठेवला आहे. धनगरांना त्यांच्या घटनादत्त अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचे लाभ हे माना, गोवारी आणि ओरीसातील कुली या जाती- जमातीं प्रमाणे न्यायालयीन मार्गानेच मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धनगर समाज बांधवांनी सर्व प्रकारच्या त्यागाची तयारी ठेवण्याचे, न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक बळ पुरविण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपनगरचे उपमुख्य अभियंता एन आर देशमुख होते. प्रास्ताविक चंद्रशेखर सोनवणे यांनी तर सूत्रसंचालन अनुक्रमे डॉ. पद्माकर सावळे, प्रीतम भागवत, साकेगाव यांनी केले. योगेश गांधेले यांनी आभार मानल्याचे जिल्हाप्रमुख चंद्रशेखर रवींद्र सोनवणे कळवतात.