धक्कादायक, वेदनादायी: भंडारा जिल्हा रुग्णालयात आग: दहा बालकांचा मृत्यू

0

भंडारा:आजची पहाट संपूर्ण देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी फार दुर्दैवी, वेदनादायी आणि धक्कादायक ठरली आहे. भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

भंडाऱ्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आगीची ठिणगी पडली. शनिवारी रात्री अचानक ही घटना घडली. नर्सने लागलीच ही माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर सगळीकडे धावपळ सुरू झाली.

या घटनेबद्दल देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकीपाच लाखांची मदत करण्यात येणार असल्याचीघोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी रुग्णालय गाठत घटनास्थळाची पाहणी केली. या घटनेप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठकही झाली आहे.

Copy