धक्कादायक: लॉकडाउनमध्ये दहा हजारापेक्षा अधिक कंपन्या बंद

नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात सर्वच क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद झाल्या आहेत.  कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) दिलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या १० महिन्यांच्या कालावधीमध्ये देशातील दहा हजार ११३ कंपन्या बंद झाल्यात. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचे केंद्राने म्हटले आहे. यापैकी सर्वाधिक कंपन्या बंद झालेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचाही समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात कंपन्या बंद होण्यामागील सर्वात मोठं कारण हे देशात लागू करण्यात आलेला लॉकडाउन असल्याचे सांगण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या.

लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. वर्ष २०२०-२१ मध्ये कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २४८ (२) अंतर्गत एकूण १० हजार ११३ कंपन्यांना बंद करण्यात आल्या असंही ठाकुर यांनी स्पष्ट केलं. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत असंही राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

Copy