Private Advt

धक्कादायक! नाशिकमधून ईव्हीएम मशीन चोरीला? दोघांवर गुन्हा दाखल

 

नाशिक –  नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबडमध्ये असलेल्या केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून काही ईव्हीएम मशीन गायब झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने तक्रार दिली असून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार राजेश अहिरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यात म्हटले आहे की, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेले ईलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स आणि व्हीहीपॅट हे दोन्ही अंबड औद्योगिक वसाहतीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आले आहेत. या मशिन्सच्या निगराणीसाठी गोदामामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यन्वित करण्यात आले आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार या सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग तपासणे आवश्यक असते. निवडणूक शाखेने हे रेकॉर्डिंग मागितले पण ते देण्यास टाळाटाळ करण्यात आला. २७ फेब्रुवारी २०१९ ते ११ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीत काही ईव्हीएम मशिनची चोरी झाल्याचा संश व्यक्त केला जात आहे. या सर्व प्रकारणाची शहानिशा करण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखा कामाला लागली आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीनुसार, अंबड गोदामात निगराणी करणारे मीना सारंगधर आणि अक्षय सारंगधर यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरवाडे हे अधिक तपास करीत आहेत.