धक्कादायक : जैतपूर परिसरात १२ मोरांचा मृत्यू

वनविभागात खळबळ ; प्राणीमित्रांनी पशुवैद्यकीय अधिकार्‍यांबद्दल केली नाराजी व्यक्त

शिरपूर (भिका चव्हाण) : तालुक्यातील जैतपुर परिसरातील १२ मोर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आले असून विषयुक्त अन्न खाल्यामुळे मोरांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.तर एक मोराची ही प्रकृती खराब असल्याने शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत .शिरपूर तालुक्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ करीत पशुवैद्यकीय अधिकार्‍याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर या मोरांच्या मृत्यूने वन विभागात खळबळ व्यक्त करण्यात आहे.
शिरपूर तालुक्यातील जैतपुर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. तसेच बारमाही पिके जास्त प्रमाणात जास्त असल्याने अन्न व पाणी मुबलक असल्याने या परिसरात अनेक मोर वास्तव्यात आहेत.सध्या खरीपाचा हंगाम सुरू झाल्याने शेत शिवारात कापूस व इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे बियाणे किंवा रोपाला पेरण्या किंवा लावण्याअगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येते.तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त करण्यात येत आहे.परिसरात बागायती क्षेत्र असल्याने व या क्षेत्रात दादा राजपूत यांच्या पडीत शेत आहे शेतात मोठमोठे काटेरी झाडे झुडपे आहेत त्यामुळे या भागात मोरांचे वास्तव्य मोठ्या संख्येने आहे.आज गुरुवारी परिसरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास ठिकठिकाणी मोरांचा मृत्यू झाल्याचे नागरिकांना दिसून आले.त्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. वनविभागाचे हिसाळे बिटचे वनपाल कपिल पाटील,वन रक्षक मुकेश गुजर,वन्य प्राणीमित्र योगेश वारुळे अभिजित पाटील,महेश करंकाळ आदी अधिकारी व कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. प्राणीमित्र योगेश वारुळे यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा लगेच त्यांनी थाळनेर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कांबळे यांना सांगून घटनास्थळी पोहचत मोरांवर उपचार करण्यास विनंती केली परंतु डॉ.कांबळे यांनी आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याचा आरोप प्राणी मित्र योगेश वारुळे यांनी करीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कांबळे यांच्या विषयी नाराजी व्यक्त करीत मृत १२ मोर व १ प्रकृती अत्यवस्थ असलेला मोर वनविभागाच्या कर्मचार्‍यासह शिरपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उचारासाठी दाखल झाले.तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश बारी,पशु सहाय्यक डॉ.दिलीप गोरे यांनी जिवंत मोरावर उपचार केले. तसेच काहीतरी विषारी पदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याने मोरांचा मृत्यू झाल्याचे प्रथदर्शनी दिसून येत असल्याचे सांगितले आहे.

Copy