धक्कादायक! कोरोना बाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या क्रमांकावर

0

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोज विक्रमी वाढ होत आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात एकूण १०,९५६ नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण ३९६ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाखच्या जवळ जाऊन पोहोचली असून भारताने युनायटेड किंगडमला मागे टाकत सर्वाधिक करोनाबाधितांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारतात करोना रुग्णांची संख्या तीन लाखांच्या घरात पोहचली आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. यानंतर ब्राझील, रशिया आणि आता भारताचा नंबर आला आहे. भारताने शुक्रवारी युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंडलाही मागे टाकले आहे.

गेल्या आठवड्यापासून भारतात रोज दहा हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर येत आहेत. मात्र गेल्या २४ तासांत सर्व विक्रम तुटले आहेत. जगात ज्या देशांत आता रोज सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्यात भारतही सामील झाला आहे आणि तीसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेत रोज २० हजार, तर ब्राझीलमध्ये रोज जवळपास १५ हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर त्याच्या खालोखाल भारताचा नंबर आहे. येथे रोज १० हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. टेस्टिंगच्या बाबतीत आता भारताचाही वेग वाढताना दिसत आहे. आता भारतात जवळपास ५४ लाख लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या एका दिवसाला जवळपास सरासरी दीड लाख टेस्ट होत आहेत. लवकरच हा वेग रोज २ लाख टेस्टपर्यंत पोहोचेल. अमेरिका, रशिया आणि इंग्लंडनंतर टेस्टिंगच्या बाबतीत भारत चौथ्या नंबरवर आहे.

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले पाच देश

अमेरिका – २० लाख रुग्ण

ब्राझील – ८ लाख रुग्ण

रशिया – ५ लाख रुग्ण

भारत – २.९७ लाख रुग्ण

इंग्लंड – २.९२ लाख रुग्ण

Copy