दोष महापालिकेचा, भोग नागरिकांच्या वाटेला!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात कोणतेही काम करताना विविध विभागांमध्ये एकमेकांशी असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे असुविधांमध्ये भर पडत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील बहुतांश रस्त्यांचे गेल्याच महिन्यात डांबरीकरण करण्यात आले होते. आता अवघ्या महिन्याभरातच या रस्त्यांचे विविध कामांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सर्व विभागामंध्ये समन्वय झाल्यास एकाचवेळी सर्व कामे होतील व सर्वांचाच त्रास वाचणार आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकार्‍यांनी याकडे लक्ष पुरविण्याची आवश्यकता आहे.

नागरिकांना नाहक मनस्ताप
रस्ता खोदताना त्यामधील असलेल्या टेलिफोनच्या केबल, वीज मंडळाच्या केबल, पाण्याच्या मुख्य जलवाहिनी, जलनिस्सारणाची पाईपलाईन अशांचा संबंध येतो. त्यामुळे कोणत्याही रस्त्यांचे काम करताना महापालिकेचा स्थापत्य विभाग, जलनिस्सारण विभाग, पाणीपुरवठा विभाग, आरोग्य विभाग यांच्यात एकमेकांशी समन्वय असणे गरजेचे असते. ज्यामुळे चुकीचे काम होणार नाही. मात्र, असे काम करताना कोणताही विभाग एकमेकांशी समन्वय साधत नसल्याने डांबरीकरणानंतर अवघ्या काही दिवसांतच केबल व इतर कामांसाठी रस्त्यांची खोदाई, केबल्स तुटणे, पाण्याची पाईपलाईन फुटून पाण्याचा तुटवडा निर्माण होणे, अशा अनेक गोष्टी घडतात. आणि याचा नाहक त्रास रहिवाशींसह वाहतुकदारांना भोगावा लागतो.

माहिती असतानाही वारंवार डांबरीकरण
हा सगळा प्रकार माहिती असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येते व त्याचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. असाच काहिसा प्रकार शहराच्या अंतर्गत भागातील बहुतांश रस्त्यावर पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत आणि निवडणूक संपल्यानंतर शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. काही रस्त्यांचे गेल्याच महिन्यात डांबरीकरण झाले. मात्र, अवघ्या महिन्याभरातच या रस्त्यांची खोदाई करण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सुस्थितीत असलेले रस्ते आता खोदाईमुळे खड्डेमय झाले आहेत. मोबाईल कंपन्यांचे केबल टाकण्यासाठी रस्त्यांची खोदाई झाल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे. रस्त्यांचे खोदकाम केले जाणार होते, तर त्यांचे डांबरीकरण का केले? असा सवाल नागरिक विचारत आहेत. मात्र महापालिकेकडे त्याचे उत्तर नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.