Private Advt

दोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय अधिकार्‍यासह वैद्यकीय अधिकार्‍याची पोलीस कोठडीत रवानगी

धुळे : एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामाच्या मानधनाचे 17 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी दोन हजारांची घेताना शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण पंडित मोरे (34, हल्ली मु.भोई गल्ली, वर्षी, ता.शिंदखेडा) व नरडाणा वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज बारकू वाडेकर (41, दत्त कॉलनी, साई मंदिराजवळ, देवपूर, धुळे) यांना धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली होती. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता ही कारवाई करण्यात आली होती. संशयीत आरोपींना शनिवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

लाच प्रकरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यकाकने एनआरएचएम अंतर्गत केलेल्या कामांचे मानधनाचे 17 हजारांचे बिल मंजूर करण्यासाठी शिंदखेडा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भूषण मोरे व नरडाणा वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज बारकू वाडेकर यांनी प्रत्येकी एक हजारांची लाच 23 जुलै रोजी मागितली होती. या संदर्भात धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी पथकाने सापळा रचला. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास नरडाणा वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निवासस्थानी संशयीत आरोपींनी प्रत्येकी एक हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना अटक केली होती. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना शनिवारी धुळे न्यायालयात हजर केले असता न्या.गायकवाड यांनी संशयीतांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे व सहकारी करीत आहेत.