दोन वेगवेगळ्या घटनांतर दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू

0

जामनेर । तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर दुसर्‍या घटनेत कर्ज बाजारीपणाला कंटाळून एका इसमाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. यात महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा आरोप सासरच्या लोकांवर केला. याबाबत पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली गेली असून तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

दोन्ही बहिणी : जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथील सासर व हिवरखेडा बु॥ माहेर असणार्‍या वंदना अर्जून तायडे (35) या महिलेचा आपल्याच शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. मात्र मयत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त करीत तिला मारुन विहिरीत टाकले असल्याचा आरोप केला. मयत महिला आणि तिची लहान बहिण एकाच कुटुंबात जेठानी आणि दिरानी म्हणून दोघ सक्या भावांना दिल्या आहेत. 6 रोजीच्या संध्याकाळी वंदना तायडे हिची लहान बहीण यांच्या सांगण्यानुसार आपण व माझी मुलगी शेतात तुर ठोकण्याचे काम करीत असतांना जेठानी मयत वंदना शेतात आली. आपल्याशी गप्पा झाल्यावर तिच्या मुलाला बकर्‍या घरी घेवून जाण्याचे सांगीतल्यावर नंतर कुठे गेल्या माहित नाही. परंतु संध्याकाळी उशीर होवूनही मयत वंदनाबाई घरी आले नसल्याने शोध घेतला असता. वंदनाबाईचा मृतदेह विहिरीत आढळून आला. दुसर्‍या दिवशी दि. 7 तारखेला मयत वंदनाबाईचा मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला असता. माहेरचे नातेवाईक यांनी संताप व्यक्त करीत वंदनाबाई हिला मारुन टाकून विहिरीत टाकल्याचा आरोप करुन मयत वंदनाबाईचा अंतिम संस्कार माहेरी हिवरखेडा येथे करण्यात आले. मात्र समाज रुढीनुसार विवाहीतेचा अंतिम संस्कार सासरीच करावा लागतो. त्यानुसार शेवटी पोलीस बंदोबस्तात वंदनाबाईचा अंतिम संस्कार करण्यात आला. याबाबत पहुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. असून पो.उ.नि.पी.एस.कदम हे तपास करीत तपासानंतर व शवविच्छेदन अहवालानंतर घटनेचा उलगडा होणार आहे.

कर्जबारीला कंटाळून एकची आत्महत्या
तर दुसरीकडे तालुक्यातीलच तळेगाव येथील रहिवाशी युवराज माणीक सोनवणे (42) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून जामनेर येथील एका शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. मरणाच्या अगोदर मयत युवराज सोनवणे यांनी विहिरीजवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात आपण कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले होते. त्यावेळी आपल्याजवळील रक्कम 2700 रुपयेही बाजुला काढून ठेवलेले आढळले. याबाबत जामनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.