दोन विशेष रेल्वेने 1 हजार 917 नागरिक बिहारकडे रवाना

0

नंदुरबार: येथे लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 1 हजार 917 बिहारी नागरिकांना दोन विशेष रेल्वेने बिहारला पाठविण्यात आले. यात दरभंगा येथील 1 हजार 37 आणि सहरसा येथील 880 नागरिकांचा समावेश आहे. खा. डॉ.हिना गावित आणि जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखविला.

कोविड-19 प्रतिबंधासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बिहार येथील काही मजूर आणि अक्कलकुवा येथील मदरशातील नागरिक जिल्ह्यात अडकले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या नागरिकांकडून घरी जाण्याची मागणी करण्यात येत असल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बिहारच्या सचिवांशी संपर्क साधून या नागरिकांना स्विकारण्याची विनंती केली. याबाबत गेल्या 15 दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. मुंबई येथील नियंत्रण कक्षाचे सहकार्य घेण्यात आले. या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिहार येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर बिहार प्रशासनाने मजूरांना स्विकारण्यास सहमती दर्शविली. श्रमीक एक्स्पे्रस सुरू झाल्यानंतर रेल्वे विभागाशी प्रशासनाने संपर्क साधला. रेल्वेद्वारे बिहारमधील नागरिकांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सायंकाळी चारच्या सुमारास दोन्ही रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाल्या. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून नायब तहसीलदार आणि वैद्यकीय अधिकार्‍यांनी संबंधित तालुक्यातील नागरिकांशी समन्वय साधला. नागरिकांच्या भोजन पाकीट आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आली. सर्व प्रवाशांची नोंद घेण्यात आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या प्रवाशांना रेल्वेत बसविण्यात आले.सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी रेल्वे स्थानक परिसरातील सर्व व्यवस्थेचे नियोजन केले. गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गावी जायला मिळत असल्याने सर्वांच्या चेहर्‍यावर समाधान होते.

2 हजार 458 नागरिकांना रवाना करणार
पुर्णिया येथील 1 हजार 245 आणि अरेरिया येथील 1 हजार 213 नागरिकांना गावाकडे पाठविण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात येणार आहे. मंगळवारी पाठविण्यात आलेल्या नागरिकात नंदुरबार तालुक्यातील 27, नवापूर 51, शहादा 10, तळोदा 6 आणि अक्कलकुवा येथील 1 हजार 823 नागरिकांचा समावेश आहे.

Copy