दोन लाख बालकांना पोलिओ लसीकरण

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेतर्फे पल्स पोलिओ लसीकरणाचे दुसरे सत्र रविवारी (दि. 2) रोजी राबविण्यात आले. या पल्स पोलिओ मोहिमेत सुमारे दोन लाख बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला. या मोहिमेचे उद्घाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते भोसरी रुग्णालयात करण्यात आले. एका बाळाला त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात पोलिओचा डोस पाजून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, रोटरीचे एस.के. जैन, आरोग्य सेवेचे सहाय्यक संचालक डॉ. आंदुरकर आदींची उपस्थिती होती.

शहरात ठिकठिकाणी लसीकरण केंद्र
या मोहिमेसाठी महापालिका प्रशासनाकडून शहरात ठिकठिकाणी 826 लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. या सर्व केंद्रांमार्फत लसीकरण करण्यात आले. त्यात 26 ट्रान्झिट व 49 फिरत्या लसीकरण केंद्राचा समावेश होता. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी 53 वैद्यकीय अधिकारी, 182 पर्यवेक्षक व 2 हजार 427 लसीकरण कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. महापालिका आयुक्त डॉ. दिनेश वाघमारे, महापौर नितीन काळजे यांच्यासह सर्व नगरसेवकांचे या मोहिमेसाठी सहकार्य लाभले. दरम्यान, पोलिओ लसीकरण मोहिमेत शून्य ते पाच वर्षाखालील बालके वंचित राहिले आहेत किंवा नाही, याची माहिती करून घेण्यासाठी सोमवारपासून शहरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे.