दोन महिन्यात कर्ज न भरल्यास बीएचआरच्या कर्जदारांवरही दाखल होणार गुन्हे

0

जळगाव: शहरातील एमआयडीसीत मुख्य कार्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रासयोनी पतसंस्थेच्या घोटाळ्याबाबत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दरम्यान बीएचआरकडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. यात राजकीय पुढार्‍यांसह दिग्गजांचाही समावेश आहे. कर्ज घेतले मात्र, त्या कर्जाची परतफेड केली नाही. अशा कर्जदारांनी दोन महिन्याच्या आत बीएचार संस्थेकडून घेतलेले कर्जाची परतफेड करावी, अन्यथा दोन महिन्यांतर संबंधित कर्जदारांवरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे संकेत पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून देण्यात आले आहेत.

कर्ज घेतले, परतफेड केली नाही
बीएचआर पतसंस्थेच्या राज्यभरात विविध ठिकाणी विस्तार असून पतसंस्थेच्या कर्जदारांची यादीही मोठी आहे. बीएचआरमधील संचालक मंडळाने स्वतः तसेच इतरांना कुठलाही विचार न करता नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केले. तसेच ठेवीदारांची फसवणूक केली. कर्जदारांमध्ये राजकीय पुढार्‍यांसह दिग्गजांचा समावेश आहे. काहींनी कर्जाची वेळेत फेड केली मात्र, काही दिवसांनी बीएचआर ठेवीदारांची फसवणूक व अपहारप्रकरणी राज्यभरात गुन्हे दाखल झाले. बीएचआर अवसानात गेली. यानंतर कर्ज घेणार्‍यांकडून कर्जाची वसुली करुन ठेवीदारांच्या ठेवी देणे अपेक्षित होते. परंतु, अवसायक जितेेंद्र कंडारे यांच्याकडून नियमबाह्य पध्दतीने कारभार चालविण्यात आला. पतसंस्था अवसानात गेल्याने घेतलेले कर्ज आता भरण्याची गरजच नाही या अविर्भावात बीएचआरकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड केली गेलीच नाही. यात कर्जाची रक्कम कोटींच्या घरात आहे.

कर्जदारही रडारवर
बीएचआर घोटाळ्याच्या तपासात बीएचआरची मालमत्ता घेणारेही पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. आता बीएचआरच्या कर्जदारांवरही गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता वरिष्ठ सूत्रांनी बोलतांना व्यक्त केली आहे. आहे त्या कर्जदारांनी दोन महिन्यांच्या मुदतीत घेतलेल्या कर्जाची परतफेड करावी, अन्यथा दोन महिन्यानंतर बीएचआरकडून कर्ज घेणार्‍यांवरही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या छाप्यानंतर कर्ज घेतलेल्यांमध्ये कारवाईची भीती असून काही कर्जदार गोपनीय पध्दतीने कर्ज कुठे व कसे भरावे याबाबत माहिती घेत
आहेत. ते कर्जाचा भरणा करण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती मिळाली आहे.

Copy