Private Advt

दोन चंदन तस्कर जेरबंद ; चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची कामगिरी

भुसावळ/चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील वाघळी शिवारातून चंदनाची झाडे तोडून नेणार्‍या दोन संशयीत आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. वजीर खान मेहमूद खान (32) व असलम चांद खान दुलोद (23, दोन्ही रा.कुंजखेडा, ता.कन्नड, जि.औरंगाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसात दाखल होता गुन्हा
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय बळीराम बंगाळे (48, रा.वाकडी, ता.चाळीसगाव) यांनी त्यांच्या शेतात असलेल्या नाल्याजवळ चंदनाची झाडे लावलेली होती. 23 मार्च दरम्यान संशयीत आरोपी वजीर खान मेहमूद खान (32) व असलम चांद खान दुलोद (23) यांनी ही झाडे तोडून नेल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातील दुचाकी (एम.एच.27 ए.एस.1201) दुचाकी तसेच कुर्‍हाड, ड्रिल, कुदळ आणि कानस असे साहित्य हस्तगत जप्त करण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर केले असता 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दोघांकडून चोरलेल्या चंदनातील 12 हजार रुपये किंमतीचा पाच किलो चंदनाचा तुकडा जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात कन्नड तालुक्यातील आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

यांनी केली कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रमेश चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, हवालदार दत्तात्रय महाजन, नाईक जयंत सपकाळे, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी आरोपींना अटक केली.तपास पोलिस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.