दोन अपघातांमध्ये तीन जण ठार; जोगलखेड्यावर शोककळा

0

पहूर/चाळीसगाव । लहासर तांड्यावरील चव्हाण परिवार मालखेडा तांडा (ता. पाचोरा) येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतताना पहुरजवळ माल वाहतूक करणारी बोलेरो व पॅजो गाडीची धडक झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी घडली. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे. दुसर्‍या घटनेत चाळीसगाव तालुक्यातील पातोंड्याजवळ काल रात्री उशिरा अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने दोन्ही मोटारसायकलस्वार मृत्यूमुखी पडले. अज्ञात वाहनाचा चालक फरार झाला.

पहूरजवळच्या अपघातात एक ठार

मालखेडा येथून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून एम.एच. 19 एई 8739 क्रमांकांच्या पॅजो गाडीने चव्हाण कुटुंबिय गावी परतत असतांना पहुरजवळ पाचोरा रस्त्यावर मालवाहतूक करणार्‍या एम.एच. 20 डी.जे. 9199 क्रमांकांच्या बोलेरोची समोरासमोर धडक झाली, यात पॅजोचा चुराडा झाला आहे. अपघातात हरी भालचंद्र चव्हाण (वय 65) हे जागीच ठार झाले ममराज भिला चव्हाण (60), सुदाम उरवा चव्हाण (50), शेषराव रतन चव्हाण (65), दरबार प्रेमराज चव्हाण व आनंदा मैताब चव्हाण जखमी झाले त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित पांटे यांनी प्रथमोपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविले घटनेची माहिती मिळताच सरपंच प्रदीप लोढा, श्याम साबळे, संजय देशमुख, शंकर राजपूत, शिवाजी पाटील, प्रविण देशमुख, भास्कर बडगुजर यांच्यासह नागरिकांनी मदत केली.

वाहन चालकांविरुध्द गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा गावाजवळ मोटारसायकलला भडगावकडून चाळीसगावकडे येणार्‍या अज्ञात वाहनाने 20 फेब्रुवारी रोजी रात्री समोरून धडक दिल्याने पारोळा तालुक्यातील जोगलखेडे येथील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याचा रुग्णालयात नेत असतांना वाटेत मृत्यू झाला हे दोघे जण मित्राला सोडण्यासाठी चाळीसगावी जाऊन घराकडे परतत असतांना हा अपघात झाला आहे. चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जोगलखेडे (ता. पारोळा) येथील प्रविण बापु अंबोरे (22) व सचिन गणेश चव्हाण (27) हे मित्राला सोडण्यासाठी चाळीसगाव येथे गेले होते.मित्राला सोडून जोगलखेडे येथे मोटारसायकल (क्र. एम.एच.19 सी.जी. 4229) वरून जात असतांना पातोंडाजवळ सुनिल माळी यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने प्रविण बापु अंबोरे (22) यांचा जागीच मृत्यू झाला सचिन गणेश चव्हाण वय (27) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. ज्या वाहनाने त्यांच्या मोटार सायकलला धडक दिली त्या वाहनचालकाने पलायन केले . दीपक बापु अंबोरे (24, रा. जोगलखेडे ता. पारोळा) यांनी फिर्याद दिल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनाच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तपास पोलीस हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.