दोन्ही वंशांना उज्वल करणार्‍या बालिकांचा सन्मान

0

भुसावळ । दोन्ही वंशाचा उद्धार करणार्‍या जागतिक महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा येथील म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडाशिक्षक तथा शारिरीक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे यांच्यातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही मातापित्यांसह सन्मान करण्यात आला.

जागतिक महिला दिन 8 मार्चचे औचित्य साधून विविध संस्था व संघटनांच्या वतीने महिलांचा गौरव केला जातो. परंतु महिलादिनी जन्मलेल्या बालिकांचा त्यांच्या मातापित्यांसह सत्कार करण्याचे काम शारिरीक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप साखरे चार वर्षांपासून स्वखर्चातून करत आहेत.

मुलांच्या तुलनेत मुलींचा घटलेला जन्मदर वाढावा आणि बेटी बचाव बेटी पढाओ याअंतर्गत महिलांचा सन्मान व्हावा या हेतूने यंदाही महिलादिनी जन्मलेल्या बालिकांसह त्यांच्या मातापित्यांना प्रदीप साखरे, पल्लवी साखरे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, डॉ. जगदीश पाटील, प्रा. मीनल भोळे, आनंद ठाकरे यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना गौरवचिन्ह, भेटवस्तू, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सन्मानित केले.

समाजजागृती होण्यास मदत
यावेळी प्रदीप साखरे यांनी महिलांच्या सर्व क्षेत्रातील कौतुकास्पद कामगिरीविषयी माहिती देवून मुलगी ही दोन्ही वंशाचा उद्धार करणारी असल्याने तिचा योग्य तो सन्मान केला पाहिजे, असे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी विजय पवार व प्रा. मीनल भोळे यांनी साखरे परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक करून अशा प्रकारच्या उपक्रमांनी सामाजिक जाणिवांची वाढ होवून समाजजागृती होण्यास मदत होते, असे सांगितले.

उपक्रमाचे सर्वत्र कौतूक
डॉ. जगदीश पाटील यांनी मुलामुलींच्या शिक्षणात समानता येत असल्याचे सांगितले. अर्पण हॉस्पिटलमध्ये कविता दीपक वाघ, भोलाणे हॉस्पिटलमध्ये ज्योती राजेश कुळकर्णी, जयवंत हॉस्पिटलमध्ये वैशाली कुंदन पाटील, मुक्ताई हॉस्पिटलमध्ये पलक बंटी दौलतानी आणि आशा हॉस्पिटलमध्ये सोनाली गोकूळ ठाकूर यांच्यासह त्यांच्या नवजात बालिकांना सन्मानित करण्यात आले. साखरे परिवाराने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वीतेसाठी अमोल बारोट, अनिरूद्ध साखरे, प्राप्ती साखरे, अहिरे यांनी परिश्रम घेतले.