दोंडाईचा शहरातील विजेसाठी 5 कोटी मंजूर

0

दोंडाईचा : शहारातील नागरिकांना विजेच्या समस्या पासून सुटका व्हावी म्हणून नवीन एक 33/11के व्ही ए चे वीज उपकेंद्र , 63 चे 16 रोहित्र, 100 ऐवजी 200 चे 20 रोहित्र, नवीन उच्च दाबाची विजवाहिनी 8 किमी , लघु दाबाची विजवाहिनी 5 किमी, वीजहानी रोखण्यासाठी आवरण युक्त वाहिनी 8 किमी अशी एकूण 5 कोटींचा भरगोस निधी मंजूर करून आणला असून येत्या काळात हि सर्व कामे मार्गी लागणार आहेत. याशिवाय वीजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यातून भूमिगत केबल टाकण्याचा कामाचा शुभारंभ होत आहे, येत्या काही महिन्यात विजेच्या सर्व समस्या सुटतील असा विश्वास पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. रावलनगर भागात भूमिगत केबल टाकण्याच्या कामाचा शुभारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा नयनकुवंर रावल, नगरसेवक विक्रांत रावल, बांधकाम सभापती संजय मराठे, शिक्षण सभापती प्रियंका ठाकूर, नगरसेवक सागर मराठे, निखिल राजपूत, माजी विरोधी पक्षनेते प्रवीण महाजन, सुफियान तडवी, संजय तावडे, नाना धनगर, कृष्णा नगराळे, माजी नगराध्यक्ष नाना मराठे, पप्पू धनगर , प्रमोद चौधरी, दिलीप जाधव, विरेंद्र गिरासे, ईश्वर धनगर, पंकज बोरसे, जोहरा शाह, राजेश ईशी, प्रमोद चौधरी, नरेंद्र ठाकूर, कार्यकारी अभियंता ठाकूर, उप कार्यकारी अभियंता जगताप यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते

यावेळी बोलताना मंत्री रावल म्हणाले की, दोंडाईचा शहरात आगामी काळात मोठ्या प्रमाणावर विकासासाठी निधी येणार असून शासन स्तरावर माझा पाठपुरावा सुरु आहे. पालिकेच्या माध्यमातून मागील काळात झालेले सर्व गैरव्यवहार बाहेर येणार असून एक पारदर्शी कारभार होण्यासाठी सर्व नवीन नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना सूचना द्याव्यात, विकास कामांमध्ये नागरिकांचा सहभाग देखील तेवढाच महत्वाचा असून प्रत्येक काम पारदर्शी होण्यासाठी नागरिकांना आम्ही सहभागी करून विकासाचा मार्ग धरला आहे. नदी सुशोभीकरण हे एक आदर्श पद्धतीचे काम असावे म्हणून अनेक संघटना यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील मंत्री जयकुमार रावल यावेळी म्हणाले. सूत्रसंचालन विरेंद्र गिरासे यांनी तर प्रस्तावना कार्यकारी अभियंता ठाकूर यांनी केली.