Private Advt

‘दैनिक जनशक्ती’च्या दणक्यानंतर भुसावळात यावल रस्त्याच्या डागडूजीला सुरूवात

भुसावळ : तब्बल एक कोटी दहा लाख रुपये खर्च करून अवघ्या सहा महिन्यांपूर्वी यावल रस्त्याचे काम करण्यात आले होते मात्र निकृष्ट कामामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारकांसह शहरवासीयांमधून संताप व्यक्त होत होता. या संदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ने रविवार, 12 सप्टेंबरच्या अंकात ‘सहा महिन्यात यावल रस्त्यावर खड्डे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेत ठेकेदारास रस्ता दुरुस्तीबाबत सूचना केल्यानंतर बुधवारी रस्त्यावर डांबराने पॅचवर्कच्या कामाला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर निधी खर्चून रस्त्याचे काम करण्यात आल्यानंतरही रस्त्याचा दर्जा सुमार असल्याने रस्ता कामाची सखोल चौकशी करावी, अशी सुज्ञ शहरवासीयांची मागणी आहे.

अवघ्या सहा महिन्यात रस्त्यावर खड्डे
अर्थसंकल्पात मंजूर निधीतून यावल रस्त्याचे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले. शहरातील वर्दळीचा असलेल्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्ता कामाचा दर्जा राखला जाणे अपेक्षित होते मात्र ठेकेदाराने निकृष्ट काम केल्याने अवघ्या सहा महिन्यात रस्ता खड्डेमय झाल्याने नागरीकांसह वाहनधारकांतून संताप व्यक्त करण्यात आला. मूळात रस्ता काम करताना ठेकेदराकडून या कामास दिरंगाई झाली. यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यासमोरील भाग, साईजीवन सुपर शॉप परीसर, सेंट अलॉयसेस शाळेजवळ या रस्त्याला खड्डे पडल्याने मोठा मनस्ताप सोसावा लागत होता. ‘दैनिक जनशक्ती’ने रविवार, 12 सप्टेंबर रोजी निकृष्ट रस्ता कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधल्यानंतर बुधवारी या रस्त्याच्या डागडूजीला सुरूवात करण्यात आली. डागडूजी केल्यानंतर आता आगामी काळात हा रस्ता किती दिवस टिकेल? असा प्रश्‍न शहरवासी उपस्थित करीत आहेत. या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठांकडून चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.